फॉलोअर

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

नात्यांमध्ये बांधलेल्या व्यक्तीला जगण्याचे स्वातंत्र नसते का ?

 
आपल्या सारख्या सर्व शहाण्या लोकांनी मिळून समाज बनला आणि या समाजात कटुंब व्यवस्था हि आपल्या सारख्या सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या लोकांनीच जन्माला घातली. लोकांनी जनावरासारखे वागू नये माणूस म्हणून जगावे यासाठी संस्कार नावाची गोष्ट तयार झाली. पाप - पुण्य , चांगले - वाईट , खोटे - खरे असे वेग-वेगळे शब्द अर्थांसहित उदयाला आले... हे सर्व कधी पासून आहे.,  हे खूप लोकांना माहित नाही माणसाचे आयुष्यमान पाहिले तर फक्त ६० - १०० वर्ष त्यात पण अनेक कर्तव्य अनेक नाती जपत आपण जगत असतो ... बऱ्याचदा मन मारून हि जगतो .. का वागतो आपण असे याचा कधी आपण विचार केला आहे का ? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच घटनांना आपण स्वतः कारण नसताना तासनतास चघळत बसतो .. कुटुंबातील लोकांवर भरपूर हक्क दाखवतो आणि ते दाखवत असताना आपण हे विसरून जातो कि समोरच्या व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व आहे आणि आपण जरुरी पेक्षा जास्त अधिकार गाजवणे हे कोणाच्याही हिताचे ठरणार नाही . समोरच्याने आपले ऐकले नाही कि आपला स्वाभिमान दुखावला जातो.  आपल्याला त्रास होतो .. आई वडिलांना असे वाटते आमच्या पेक्षा मुलांचे कोणी चांगले करूच शकत नाहीतर बायको ला वाटते कि माझ्याशिवाय माझ्या नवऱ्याला कोणी सांभाळू शकत नाही , नवऱ्याला वाटते कि माझी बायको फक्त माझ्या कुटुंबाची सेवेकरी आहे.आणि तिचे काय हवे नको ते पाहणे माझे कर्तव्य आहे .. भावाने कसे वागावे , बहिणीने कसे वागावे .आपल्या समाजात प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तिरेखा या वर्षानुवर्षे कोणीतरी ठरवून दिलेल्या आहे आणि त्यात थोडे कुठे काही खट्ट झालं कि , भांडण सुरु ... 
            
              प्रत्येक नात्यातील व्यक्तीला माणूस म्हणून आपण कधी पाहायला शिकणार.  आपल्याकडे कितीतरी महिला आणि पुरुष असे आहेत कि त्यांनी सर्वस्व कुटुंबालानात्यांना वाहून दिले आहे पण कधी त्यांना कोणी विचारले हि नाही कि , बाबारे किंवा बाई ग तुला तुझ्या आयुष्यात काय हवं आहे , आमच्यासाठी तू आयुष्य वेचत आहेस तू स्वतःसाठी काय केलं .. स्वतःसाठी किती वेळ दिला . तुझ्या मनाला जसे जगावेसे वाटते तसे तू जगत आहेस का ? पण याउलट जर कोणी भूमिकेच्या विरोधात थोडे काही केले कि मग प्रश्नांचा भडीमार सुरु होतो .. हेच का संस्कार , तू असे वागण्याची हिम्मत च का केलीइत्यादी .. इत्यादी ...  प्रत्येक नात्याच्या एका ठरलेल्या भूमिकेबाहेर कोणी वागण्याचा प्रयत्न केला कि , त्याला गुन्हेगार ठरवून सर्व लोक दोष देतात ... 
 

                   स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या आपल्या सर्वाना हे कधी कळणार किइतरांची वागणूक चांगली कि वाईट हे ठरवणारे आपण कोणीही नाही...  आपण त्या व्यक्तीच्या भूमिकेत असतो तर आपण कसे वागलो असतो. आपण अगदी सहज म्हणतो "तुझ्यावर जी परिस्थिती आली ना ती माझ्यावर आली असती तर मी खूप चांगला मार्ग काढून बाहेर पडलो असतो / असते ..." पण खरंच शांतपणे विचार करा हे बोलणे जितके सोपे आहे तितके वागून दाखवणे खरंच सोपे आहे का ?  कदाचित तुमच्यावर जर काही प्रसंग ओढवला असता खरंच , तर तुमच्यातील फाजील अति आत्मविश्वासामुळे तुम्ही अजूनहि  जास्त  अडकला असतात .. वेळ सांगून येत नाही .  कुटुंबातील व्यक्ती तुमची बायको / नवरा असो , आई - वडील असो , मुलं असो , भावंडं असो , नातेवाईक असो , नात्याचे नाव काहीही असुद्या पण त्या नात्याच्या भूमिकेबाहेर जाऊन समोरच्या व्यक्तीला एक वेगळे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून पहा . त्यांच्या आवडीनिवडीना चूक किंवा बरोबर च्या पारड्यात न बसवता त्या व्यक्तीची गरज म्हणून पहा.. स्वतःला त्या जागी ठेऊन पहा .. शांतपणे मार्ग काढा ... कुटुंबात वाद विवाद टाळा आणि प्रत्येक व्यक्तीचे मन समजून घ्या.. भूमिकेबाहेर त्या व्यक्तीला स्वतःचे आयुष्य आहे हे समजून घ्या .......  कुटुंबातील प्रत्येकाला त्याची स्पेस द्या .. नात्यांना भूमिकेच्या ओझ्याखाली गुदमरून टाकू नका .. प्रत्येकाला स्वतःचे चांगले - वाईट कळते त्यामुळे अवास्तव हक्क गाजवून निर्णय लादू नका .. नाहीतर नाती फक्त नावापुरती उरतील आणि त्यातील प्रेम हे फुलातील सुंगध आणि नाजूक पाकळ्यांप्रमाणे वादळासोबत उडून खूप दूर निघून जाईल मग उरतील फक्त केविलवाण्या आठवणी .. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा