फॉलोअर

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्ग नसेल तर प्रेम खोटे होते का ?





सर्व काही असताना एकटेपणात दिवस काढणे ,
हे खूप कठीण असते.. ! सर्वाना नाही जमत .... !




प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्ग नसेल तर प्रेम खोटे होते का ? 

ज्या व्यक्तीवर आपण  जगात सर्वात जास्त प्रेम करतो आणि ज्या व्यक्तीला आपले सर्वस्व मानून काहीही करायला तयार असतो, त्याच व्यक्तीचा आपल्यावर आणि आपल्या प्रेमावर  विश्वास नसेल तर खूप वाईट वाटते , 


प्रेम व्यक्त करण्याचे सर्व मार्ग तीच व्यक्ती बंद करते , फोन वर बोलण्याच्या मर्यादा , message पाठवण्यावर मर्यादा , भेटण्यावर मर्यादा , त्यामुळे कसे सांगणार कि, एक दिवस जरी आवाज नाही ऐकला तरी किती अस्वस्थ व्हायला होते, जर समोरून फोन ची वेळ मिळाली तर सर्व कामे रद्द करून फक्त कधी ती वेळ येईल याची एखाद्या पाखरासारखी वाट पहिली जाते , आपल्या  रुसण्यावर मर्यादा , रागवण्यार मर्यादा , मनात कायम एक भीती असते कि , आपल्या  कोणत्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे ती व्यक्ती दुखावली तर जाणार नाही ना , माझ्यापासून दूर तर होणार नाही ना !  मोकळेपणाने प्रेम व्यक्त करू शकत नाही कारण त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य distrub करायचे नाही हे मनात पक्के असते त्या व्यक्तीची आयुष्यभर साथ मिळावी यासाठी एकही चुकून चूक होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे वाटते , त्या व्यक्तीचा आदर समाजात , कुटुंबात कमी होऊ नये यासाठी आपण स्वतःवर बंधन घालत असतो , आणि हे सर्व त्या व्यक्तीच्या सांगण्यावरूनच आपण करत असतो...  ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला आपल्या बेधुंद वागण्यामुळे त्रास होऊ नये हा हेतू असतो , प्रेम व्यक्त करायला एक हि मार्ग ती व्यक्ती आपल्यासमोर ठेवत नाही आणि प्रेम व्यक्त नाही केले  कि तीच व्यक्ती बोलता बोलता आपल्या प्रेमावर अविश्वास दाखवून कळत नकळत पणे लग्नाचं नातं आणि प्रेमाचं नातं यातला फरक दाखवून देते., तेव्हा वाईट वाटते , कवितांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या कि , तीच व्यक्ती विचारते हे फक्त माझ्यासाठीच कशावरून ?  असो ... 

जर या जगात कुठे देव असेल ना तर त्याला माहित आहे कि माझं प्रेम खरं आहे कि खोटे ... मला नाही सिद्ध करायचं काही कोणापुढे ... कारण खरचं खूप खूप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी मी माझं सर्वस्व अर्पण केलं आहे ....  या पेक्षा जास्त अजून काय करायला हवं माहित नाही ... कोणाला माहित असेल तर जरूर सांगा मी ते हि करून पाहीन , मला त्या व्यक्तीकडून फक्त , प्रेम , विश्वास , आणि माझ्या त्याच्या प्रति असणाऱ्या भावनांचा  आदर बस इतकेच पाहिजे याहून अधिक काहीच नाही .... 



मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

मैत्री म्हणजे काहींसाठी गरज पूर्ण करण्याचे साधन

 देवाने आपल्याला जन्माबरोबर अनेक नाती दिली आहेत.  तरीही आपल्याला मैत्रीच्या नात्याची एक वेगळी ओढ असते ., आणि एखाद्या व्यक्तीचे आपले विचार जुळले की, आपण एकमेकांचे खूप छान मित्र किंवा मैत्रिणी होतो. पण दरवेळी मैत्री टिकवण्याची धडपड एका बाजूने होत असेल तर त्या मैत्रीला किती महत्त्व द्यायला हवं याच भान असणं खूप गरजेचं असतं. 

शुक्रवार, २३ जून, २०२३

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

 लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :


१) किमान ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला समजून घेण्यासाठी देणे आवश्यक आहे. (सगळे लोक चांगलेच असतात पण आपल्याला ६ महिन्यातच लक्षात येते कि आपले इथे जमेल कि नाही) शेवटी तडजोड किती करता येईल आणि खरच त्याची तेवढी आवश्यकता आहे का ? हा हि प्रश्न महत्वाचा आहे.  यावर हि विचार करावा 


२) कोणताही निर्णय घाई - घाई ने घेऊ नये , तसेच आपल्या मर्यादा आपल्याला माहित असाव्या भावनेच्या भरात येऊन अशा कोणत्याही गोष्टी करू नये ज्याचा नंतर मनस्ताप आणि पश्चाताप होईल. आपण हे नाते आपल्या आनंदासाठी जोडणार आहोत, त्रास होण्यासाठी नाही याची जाणीव ठेवावी 


३) कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार हे आपल्या विश्वासातील लोकांना सांगितल्याशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय करू नये , कितीही महत्वाचे असले तरी 


४) लक्षात घ्या कि , तुम्ही आता सहजीवनासाठी आणि पुढील आयुष्य आनंदात जगता यावे यासाठी जोडीदार शोधत आहात त्यामुळे कमीत कमी जबाबदारी असणाऱ्या स्थळांना संपर्क करा. कोणाच्याही पश्चात  दोघांपैकी कोणाच्याही मुलांवर एकमेकांचा भार येणार नाही याची काळजी घ्या 


५) एखादा करार करून तो रजिस्टर करून घ्या. 


६) प्रॉपर्टी च तुम्ही काय करणार आहेत हे दोघांच्याही मुलांना कळणे गरजेचे आहे. 


७) आरोग्य विषयक जबाबदारी तुम्ही किती घेऊ शकता याचाही उल्लेख सुरवातीलाच करावा 


८) एकेमकांची खरी माहिती मिळण्यासाठी कागदपत्रावर भर द्या , आणि आता ज्या वयात तुम्ही आहात या वयात तुम्ही कोणताही प्रश्न विचारण्याचा संकोच करू नका , शंकाचे निरसन  व्यवस्थित करून घ्या. 


९) कुठेही काही संशय आला तर संस्थेत संपर्क करून योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 


१०) झेपणार नाहीत अशी कोणतीही आश्वासने व्हाट्सअप द्वारे देऊ नका किंवा असे कोणतेही वक्तव्य करू नका ज्याचा पुढे तुमच्या मुलांना किंवा मुलींना त्रास होईल 


११) अग्रीमेंट मध्ये पुढील उल्लेख जरूर करावा कि काही कारणास्तव दोघांचे जर एकमेकांसोबत पटले नाही तर वेगळे होताना काय नियम असतील ?


१२) जो पर्यंत तुम्ही आहे तो पर्यंत तुमच्या संपत्तीचे अधिकार सोडू नका,. असे म्हणतात कि , "बसायचा पाट कोणाला देऊ नये "  सुरक्षिततेच्या दृष्टीने  एखादे मृत्युपत्र तयार करून रजिस्टर करून ठेवा. त्याची कल्पना मुलांना देऊन ठेवा. 


१३) एकदा विचार जमले , नीट ओळख झाली , विश्वास बसला कि , तुम्ही स्वतःच किंवा तो जोडीदार तुम्ही एकमेकांसाठी नक्कीच काहीतरी करणार तेही न बोलता पण हे सर्व समजायला वेळ द्यावा ;लागतो , 


१४) विवाह करणार असाल विवाह पूर्व करार करा 


१५) समुपदेशन घ्या , स्वतःचे प्रोफाइल नीट काळजीपूर्वक समजून घ्या , सत्य स्वीकारा आणि भूलथापा देणाऱ्या लोकांपासून सावध रहा. शब्दावर विश्वास ठेवायचे हे दिवस नक्कीच नाही हे लक्षात असुद्या. 


धन्यवाद 

हेमा यादव कदम 

हॅपी सिनिअर्स 

९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

मैत्री निरपेक्ष अपेक्षांचं सुंदर नातं आहे .

मैत्री म्हणजे उपकार नसून साथ आहे , 

मैत्री स्वैराचार नसून स्वातंत्र आहे, 

मैत्री निरपेक्ष अपेक्षांचं सुंदर नातं आहे . 


संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कधी दुर्जनाची

माझ्या साठी मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे ., पण गेल्या काही दिवसात माझ्या बाबतीत अशा काही गोष्टी घडल्या कि, मैत्री म्हणजे नक्की काय ? आणि या नात्याचे जीवनात काय महत्व असते या विषयावर मला थोडे लिहावेसे वाटले., वाचा आणि पटले तर नक्की तुमचे हि मत व्यक्त करा. 

जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपल्याला आपल्या माणसाची , त्यांनी आपल्याला समजून आणि ऐकून घेण्याची खूप गरज असते., समस्या आपण सर्वाना सांगू शकत नाही ., "आपलं माणूस" म्हणजे मी "कुटुंब सदस्य" किंवा "नातेवाईक" यांच्याबद्दल बोलत नाही, कारण ते आपल्या सोबत कायम असतात. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत., प्रेम म्हणून जरी हे लोक सोबत नाही राहिले, तरी कर्तव्य म्हणून ते सोबत राहणारच आहेत.,
वेळ काढून पुढील ओळींचा अर्थ जरूर समजून घ्या. 


अहंकार विस्तारला या देहाचा।

स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥

बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥

 
निसर्गाने आपल्याला जन्मजात अनेक नाती दिलेली आहेत. अगदी आपली लग्नाची गाठ सुद्धा परमेश्वर बांधतो असे म्हणतात., तरीही मनुष्यप्राण्याने मोकळे होण्यासाठी मैत्री हे नवे नाते तयार केले. मैत्री नावाच्या या एका नात्यात आपल्या सोबत कोण असावं ? हा निर्णय पूर्णपणे आपणच घेतलेला असतो. ढीगभर नाती असताना मैत्री या एका नात्याची गरज का पडत असेल बरं ? कारण मला असे वाटते कि ,  मैत्री हीच एक अशी जागा असते जिथे आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, जसे आहोत तसे राहू शकतो, इथे तुम्हाला कोणी जज करत नाही , या नात्यात भेदभाव नसतो , अवास्तव अपेक्षा नसतात ,  मित्र-मैत्रिणींकडे आपण ज्या पद्धतीने आपले मन मोकळे करू शकतो किंवा जितक्या सहजतेने व्यक्त होऊ शकतो ते इतर कुठेही होणे शक्य नाही. कारण प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात , काही कर्तव्य असतात ,  सामाजिक नियम असतात , बंधने असतात. बऱ्याच लोकांना असे वाटते कि मैत्री या नात्याला काहीच अर्थ नसतो त्यांच्या दृष्टीने मैत्री म्हणजे निव्वळ timepass.. असे समजणाऱ्या लोकांना मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ... " आर्थिक नुकसान कधीही भरून काढता येते, पण मानसिक नुकसान भरून काढणे फार कठीण असते" . कधीतरी एकदा मनोरोग तज्ञाकडे जाऊन बसा मग समजेल कि ज्या लोकांकडे मन मोकळे करायला आणि मोकळेपणाने व्यक्त व्हायला जागा नाही अशा लोकांची जास्तीत जास्त संख्या तुम्हाला समुपदेशक आणि मनोपचारतज्ञाकडे दिसेल. 

आपण ना मैत्री संदर्भातील काही ऐतिहासिक उदा पाहू .. 

१) ज्यावेळी अर्जुन रणांगणातून बाहेर पडण्याचा विचार करत होता , मानसिक दृष्ट्या खचत होता, तेव्हा त्याला ठाम पणे रणांगणात उभे राहण्यास प्रवृत्त करणारा त्याचा सखा श्रीकृष्ण होता. युद्ध जिंकण्यासाठी दुर्योधनाकडे अर्जुन पेक्षा जास्त सैन्य होते, गुरुजन , कुटुंब सदस्याचा पाठिंबा , सर्व होते., पण मानसिक बळ वाढवणारा आणि सत्याच्या जवळ घेऊन जाणारा कृष्णासारखा मित्र नव्हता. (आपण आज काल साधा वेळ देत नाही तर प्रोत्साहन कधी देणार ? खंबीर पणे पाठीशी काय उभे राहणार ?)

२) आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही जेव्हा श्रीकृष्णाच्या दारात सुदामा उभा होता तेव्हा कोणताही भेदभाव न करता स्वतः श्री कृष्णाने मित्राचे एखाद्या राजाचे करावे तसे आदर सत्कार केले आणि मित्राला भरभरून प्रेम दिले. तसेच त्याला पिढ्यानपिढ्या पुरेल इतकी संपत्ती दिली., आपला मित्र स्वाभिमानी आहे हे माहित असल्याने त्याच्या हि नकळत त्याने काही हि न बोलता कृष्णाने मणभर मदत अगदी शांतपणे त्याच्या कुटुंबापर्यंत पोहचवली. (आपण मात्र कणभर मदत करून जगभर प्रचार करत राहतो. आपल्या या अशा वागण्याला मैत्री म्हणता येईल का ? )

३) दुर्योधानाला कर्णाकडे असणारे सर्व चांगले गुण माहित होते ज्यावेळी कर्णाला तो राजाचा पुत्र नाही किंवा क्षत्रिय नाही म्हणून स्पर्धेतून बाहेर काढण्यात येत होते त्यावेळी दुर्योधनाने क्षणाचाही विलंब न करता क्षणार्धात त्याला राज्य देऊन " राजा " म्हणून घोषित केले. त्याच्या पाठीशी उभा राहिला. आपण इतका मोठा निर्णय आताच्या काळात घेऊ शकतो का ? मग उगाच च छोट्या छोट्या मदतीचा आपण बाऊ का करतो याचा विचार करायला हवा. 

आणखी एक उदा म्हणजे "सीता आणि त्रिजटा" यांची मैत्री..  यात आर्थिक व्यवहार कुठेही नव्हता तरीही मैत्री होती कारण मानसिक आधार हा देखील तितकाच महत्वाचा असतो. मैत्री हे नाते सोडले तर प्रत्येक नाते हे अनेक अपेक्षांनी ग्रासलेले असते. तुमच्या कर्तव्यात तुम्ही थोडी जरी कसूर केलीत तर कोणीही तुम्हाला समजून घेत नाही. तुमचा अगदी छान उद्धार केला जातो. 

आयुष्यात योग्य वेळेत मित्र / मैत्रिणीची किंमत करायला शिका , आपण इतके मोठे नाही कि आपल्या मित्र / मैत्रिणीच्या आजच्या काळात सर्व गरजा न सांगता पूर्ण करू पण किमान त्यांना "वेळेवर वेळ तर द्या" हे एकच निरपेक्ष नाते तुम्हाला आयुष्यभर जगायला उत्साह निर्माण करते. 
" अरे यार मी आहे ना " मी असताना काय काळजी करतोस / करतेस " आपण मिळून मार्ग काढू ... या २ वाक्यातच जगण्याला नवा हुरूप येतो. समोरची व्यक्ती आपल्याला काही देईल म्हणून कधीही कोणाशी मैत्री करू नका आणि आपण काहीतरी देतो म्हणजे समोरची व्यक्ती आपली गुलाम आहे असे हि समजू नका तुमच्या पूर्व कर्मामुळे तसेच "देवाच्या मनात आहे, म्हणून तुमच्या हातात आहे. " हे लक्षात राहूद्या. 

मैत्री करा पण आधी समजून घ्या कि नक्की मैत्री म्हणजे काय ? तुम्हाला त्याची गरज आहे का ? नसेल तर कोणासोबत हि मैत्री करू नका. कोणाच्याही भावनांशी खेळू नका. 

मैत्री म्हणजे उपकार नसून साथ आहे ,
मैत्री स्वैराचार नसून स्वातंत्र आहे, 
मैत्री निरपेक्ष अपेक्षांचं सुंदर नातं आहे . 

धन्यवाद 
हेमलता यादव-कदम 


शेवटी .. मैत्री कोणाशी करावी याबाबत संत तुकडोजी यांच्या काही ओळी सापडल्या त्या इथे share करत आहे. 

मित्रा ! कर मेत्री त्याची ।

जो सत्याविण शब्द‌ न बोले सहजहि कोणासी ।।धृ0।।
सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक  ज्याची ।

अपुले टुःख न वदे   कुणाला, चिंता   इतराची ।।१।।
चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदि न कवणासी ।

दिनचर्या सततची योग्य ती, हाव नम मानाची ।।२।।
हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल  निष्ठेची ।




सोमवार, २५ जुलै, २०२२

रोहिडा (रोहिडेश्वर) , विचित्रगड - Rohida - vichitra gad

गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा तसेच महाबळेश्वर डोंगर रांगेमध्ये वसलेला रोहिडा (रोहिडेश्वर) हा एक महत्वाचा किल्ला आहे भोर तालुक्यात हा किल्ला येतो याची उंची साधारण ३६६० फूट इतकी आहे. रोहीड खोरे हे नीरा नदी खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे.  या किल्ल्यास विचित्रगड असे देखील म्हंटले जाते. 

पुढील माहिती हि किल्ल्यावर उपलब्ध झालेली आहे. 

या गडाचा इतिहास भोज राजाच्या कालखंडापासून सुरू होतो. त्यानंतर अनेक सत्तांचा अंमल या गडावर राहिला या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावर मराठा व फारसी लेख असून त्यात मोहम्मद आदिलशहाच्या कारकीर्दीत इसवी सन १६५६ साली हा तिसरा दरवाजा बांधला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  यावरून हा किल्ला पहिली काही वर्ष विजापूराच्या सत्तेत तर कधी मराठ्यांच्या सत्तेत अशी सारखी अदलाबदल होत असणार हे लक्षात येते. 

कृष्णाजी बांदल यांच्याकडे या किल्ल्यांची जहागिरी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना  स्वराज्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले परंतु ते बांधलांनी नाकारले महाराजांनी रोहिड्यावर केलेल्या आक्रमणात कृष्णाजी बांदल मारले गेले बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे  मुख्य कारभारी होते.  लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले ११ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत जिंकून घेतला. कान्होजी जेधे यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व  जमिनीचा काही भाग इनाम होता.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर आले त्यावेळी शिरवळ ठाण्याचा अंमलदार सय्यद मजलिस याने रोहिडा जिंकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला त्यावेळी रोहिडा  खोऱ्याचा वतनदार म्हणून बाजी सर्जेराव कारभार पाहत होते दरम्यानच्या काळात रोहिडा मोगलांकडे गेला छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेरावला अभय पत्र दिले अखेर सर्जेरावाने पुन्हा या गडावर विजय मिळवला. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यात वतनदारांची तारांबळ उडाली अशातच औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आजम यास रोहिदावर पाठवले. मोघलांच्या वतनाच्या आशेने इ. स १६८९ मध्ये बाळाजी खोपडे ने रोहीड्यास वेढा घातला यावेळी रोहिडालगतची नाटंबी, करंजे , सांगवी ही गावे मोगल सैन्याने लुटून बेचिराख  करून टाकली आणि किल्ला जिंकून घेतला रा . शंकरजी नारायण यांनी आपल्या पराक्रमाने इ. स १६९३ मध्ये हा किल्ला परत जिंकून घेतला. 

छत्रपती राजारामांच्या काळात भोर संस्थानांची निर्मिती झाल्यावर सहा सरकारी नोकर या किल्ल्यावर होते.  रा. शंकरजी नारायण यांच्यानंतर सचिव घराण्याचे वंशज पंत सचिव नारोशंकर यांचे वास्तव्य काही दिवस या गडावर होते सन १८१८ साली  इंग्रजांनी अनेक किल्ल्यांचे रस्ते उध्वस्त केले, गड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटा बंद केल्यामुळे किल्ल्यांची देखभाल न होता विध्वंस  मात्र होत राहिला त्यामुळे येथे कुठलेही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत गडाच्या पायथ्याशी बाजार भरत असल्याने या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला बाजारवाडी हे नाव पडले. 

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा आहे याचे वैशिष्ट्य असे की आपण अगदी दरवाज्याच्या जवळ जाईपर्यंत हा दरवाजा उत्तराभिमुख असून त्याची बांधणी हिंदू मुस्लिम पद्धतीने करण्यात आली आहे. पहिल्या दरवाज्याच्या चौकटीत गणेशाची पट्टी व मिहराब आहे.  येथून गडावर उजव्या बाजूने वळून वर दुसऱ्या दरवाज्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आत प्रवेश केल्यावर दरवाज्याला अडगळ लावण्याची योग्य सोय केल्याचे दिसून येते तिसरे व अंतिम प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख असून दोन्ही बाजूस गज शिल्पांचे मुखवटे कोरलेले आहेत डाव्या बाजूस मराठी व उजव्या बाजूस फारसी  शिलालेख कोरलेला आहे.  त्यातील डाव्या बाजूला मेहराब महंमद आदिलशहा मुदपाकशाळा (स्वयंपाक घर) असे लिहिलेले आहे दुसऱ्या बाजूला जमादिल अव्वल सु.  (सु म्हणजे उर्दू महिन्यातील हिजरी कालगणनेनुसार) पहिल्या महिन्यात म्हणजेच सु . १०५६ दुर्मुख सवंत्सर शके १५७८ चैत्र ते ज्येष्ठ शुद्ध १० म्हणजे १६ मार्च ते २३ मे इ.  स. १६५६ यात बांधला आहे असे अनुमान निघते.  कमानीच्या दोन्ही अंगास कमळे, मत्स्य आकृती कोरलेली आहे याच  कमानीवर डावीकडे चंद्र तर उजवीकडे सूर्य आकृतीचे शिल्प करून दिशा दाखवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वनक्षेत्रासंबंधी लिहिलेले एक पत्र देखील इथे ठेवण्यात आले आहे. 

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे : 

पाण्याचे भुयारी टाके

दरवाजे 

पडझड झालेल्या तटबंदी 

भांडी 

किल्लेदाराचे घर 

भैरोबा मंदिर 

शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत.

तसेच चुन्याचे घाणे जे आता पाहायला मिळत नाही अतिशय दुर्मिळ झाले आहे 





चुन्याचे घाणे 


भांड्याचे अवशेष 


पाण्याचे टाके 





या पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे : 

वनासंबंधी छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र 

" आपले राज्यात अरण्यात सागवानवादी वृक्ष आहेत , त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजुराचे परवानगीने तोडून न्यावे.  या विरहित  जे लागेल ते परमुलखेहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे,  फणस,  आदी  करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये.  काय म्हणोन की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखे बहुत काळ जतन करून वाढवली.  ती झाडे तोडल्यावर त्यांचे  दुःखास  पारावार काय?  एकास  दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा स्वलय काळाचे बुडोन  नाहीसे होते. धनीयाचे पदरी प्रजापिडण्याचा दोष पडतो वृक्षअभावी हानी होते,  करिता हे गोष्टी सर्वथैव  होऊ न द्यावी कदाचित एखादे झाड जिर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोष तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. "



शिरवले बुरुज 



गणेश दरवाजा 



सलग पाण्याच्या ३ टाक्या आहेत एक टाकी भरली कि पाणी आपोआप पुढच्या टाकी कडे जाते १२ महिने हि पाणी पुरवठ्याची योग्य प्रकारे सोया केली होती. 

आवर्जून एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपला रांगडा महाराष्ट्र जपणाऱ्या या अप्रतिम गड - किल्ल्यांना माझा मानाचा मुजरा.... 


धन्यवाद 
हेमा यादव - कदम 



रविवार, २४ जुलै, २०२२

Malhar gad मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला

 मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला. 

निर्मिती इ.स. १७५७ ते १७६०

भीवराव पानसे तोफखाना प्रमुख यांनी बांधलेला किल्ला 

पुणे जिल्ह्यातील सासवड या सुप्रसिद्ध गावाजवळ मल्हारगड हा मराठेशाहीतील बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो, या किल्ल्याची उंची ३१६६ फूट इतकी आहे आणि गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.  पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड  आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर , वज्रगड, मल्हारगड, सिंहगड  हे किल्ले याच रांगेवर आहेत.  दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.  

किल्ल्यावर आजही पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे  खंडोबा मंदिर, महादेव मंदिर, आणि दोन विहिरी आहेत. बाकी चौकोनी आकाराचा तट अजूनही तिथे आहे चालत जाण्यासाठी  हा गड अगदी सोपा आहे येथील चोर दरवाजा देखील अजून चांगल्या स्थितीत आहे. चोर दरवाजा पर्यंत गाडी जाते. त्यामुळे अगदी अर्ध्या तासात आपण गडावर पोहचतो. गडावर मानाने आणि रुबाबात फडकणारा भगवा तुमचे लक्ष वेधून घेतो. या गडावर थोरले माधवराव पेशवे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहकार्‍यांनीही गनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी या गडाचा आश्रय घेतला होता. 

निसर्गाच्या कुशीत आजही या गडाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे . विविध पक्षी देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.

प्रत्येक गड किल्ला आपल्याला आपला रंजक इतिहास सांगण्यासाठी उभा आहे , या गड किल्ल्याचे संवर्धन करणे आपले म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. 



महादेव मंदिर 



किल्ल्याचा मुख्य दरवाजा 

बुरुज 


चोर दरवाजा 

विहीर 


खंडोबा मंदिर (सध्याची अवस्था)

धन्यवाद 
हेमा यादव-कदम 









शनिवार, २ जुलै, २०२२

sinhagad killa - सिंहगड आणि मी

सिंहगड आणि मी 


यावर्षी असे ठरवले कि, जरा महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा अभ्यास करूया. आणि इतिहासाचे वर्तमान रूप पाहूया ! 
कारण ज्या राज्यात आपला जन्म झाला किमान त्या राज्याचा इतिहास तरी आपल्याला माहिती असायला हवा असे मला वाटले त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला पुण्याजवळ किमान २१ ते २२ किल्ले आहेत असे लक्षात आले. मग सर्वात आधी सुरवात करायचे ठरले ते माझ्या घरापासून अगदी जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्या पासून आणि मग आमची स्वारी निघाली इतिहासात डोकावण्यासाठी .... 

सिंहगड किल्ल्या पर्यंत पोहचण्याचा रस्ता अतिशय सुंदर आहे जाता जाता खडकवासला हे सुंदर धरण तुमचे मन वेधून घेते तिथे थोडा वेळ थांबून तुम्ही पुढे निघू शकता, किल्ल्याच्या पायथ्यापाशी पार्किंग ची सोय आहे तिथे गाडी पार्क करून तुम्ही चालायला सुरवात करू शकता किल्ल्याच्या आत प्रवेश करताच क्षणी वन विभागाने या किल्ल्याशी संबधित नकाशा लावून ठेवला आहे त्यावरून किल्ल्यावर पाहण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत याचा अंदाज तुम्हाला येतो. पुणे दरवाजा , कल्याण दरवाजा , नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी , राजाराम महाराज यांची समाधी , खुला रंगमंच , तानाजी कडा , कलावंतिणी बुरुज , लो . टिळक यांचा बंगला , अमृतेश्वर मंदिर,  कोंडेश्वर महादेव मंदिर याच सोबत अजूनही काही ठिकाणे आहेत. 


दगडी पायऱ्या , मोठे दरवाजे , दगडी कमानी , पाहताना मनात सहज विचार येतो कि विटा सिमेंटची घरे बांधताना आपल्याला शहरासारख्या ठिकाणी इतक्या अडचणी येतात तर त्या काळात पुरेशा सोयी उपलब्ध नसताना इतके उत्कृष्ट बांधकाम कसे केले असेल. या दरवाजा नविषयी देखील काही माहिती किल्ल्यावर मिळाली. 




गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा पहिला दरवाजा येतो तो  पुणे दरवाजा यालाच डोणजे दरवाजा असे देखील म्हणतात.  मात्र हा एकच दरवाजा नसून असे एका मागोमाग एक तीन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शिल्पे आहेत.  १/७/१६९३ रोजी बावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्थ करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.  या गोष्टीला 300 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिलालेख ही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभ पूर्वक बसविला आहे.  या पहिल्या दरवाजातून आत आले की,  थोड्याच उंचावर एक दरवाजा आहे तो म्हणजे  पुणे दरवाजा क्रमांक दोन या दरवाजासंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही.  

पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा हा फारच महत्त्वाचा आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळांवरून गडाचा थेट संबंध तेराव्या शतकातील यादव काळाशी लागतो देवगिरीच्या यादवांच्या काळात विस्तृत सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर यादवांचे साम्राज्य होते आणि गडावरून यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला तरी हा दरवाजा मात्र यादवांच्या काळातच बांधला गेला असावा असे अनुमान देखील येथील रचनेवरून काढता येते. 

कोंढाणा उर्फ सिंहगड ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने ओळखला जातो त्यांच्या बद्दल हि जाणून घेऊ. 



नरवीर तानाजी मालुसरे यांची विश्वसनीय अशी फारशी माहिती आपणास उपलब्ध होत नाही.  ऐकिव माहिती वरून तानाजी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यांपैकी पाचगणी गावच्या पूर्वेस सुमारे दोन मैलांवर  असलेल्या गोडवली गावचे राहणारे होते परंतु काही कारणाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील उमराठे नावाच्या गावात येऊन राहिले होते. महाराजांनी त्यांना त्या भागात लुटा-लूट व दरोडे घालणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली होती. कवी परमानंदांच्या शिवभारतात तानाजी मालुसऱ्यांविषयी काही विश्वासनीय माहिती दिली आहे.  त्यानुसार अफजलखानास शिवाजी महाराजांनी मारताच नगाऱ्यांचा इशारा करण्यात आला.  शिवरायांच्या सूचनेप्रमाणे एक एक हजार पायदळ घेतलेले पाच सरदार शत्रूंवर तुटून पडले त्यापैकी एक तानाजी मालुसरे होते.  शिवाजी महाराजांनी कोकणातील दाभोळ, पाली , शृंगारपूर , चिपळूण,  संगमेश्वर या भागांवर केलेल्या स्वारीत त्यांच्याबरोबर पायदळाचा सेनापती म्हणून तानाजी मालुसरे सहभागी होते या मोहिमेत शृंगारपूरचा राजा सूर्याजीराव यांच्याशी झालेल्या युद्धाचे नेतृत्व तानाजी मालुसरे करीत होते. याप्रसंगी एक हकीकत घडली होती महाराजांचा सरदार निळकंठ राव हा सूर्याजीच्या हल्ल्याला घाबरून पळू लागला हे पाहताच तानाजी ने त्याचा धिक्कार करून त्यास एका दगडाला बांधून ठेवले तानाजीं मालुसरे यांनी  सूर्याजी राव शृंगारपूरकर यांच्याशी रात्रभर युद्ध करून त्यांचा पराभव केला सूर्याजी पराभूत होऊन पळून गेला हि  बातमी शिवरायांना समजताच त्यांनी तानाजी मालुसरे यांचा  मोठा गौरव केला होता. 

नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात आणला ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील दैदिप्यमान आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे मिर्झाराजा जयसिंग याच्याशी झालेल्या पुरंदराच्या तहात जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंढाणा हा महत्त्वाचा किल्ला होता. आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवरायांनी मुघलांच्या ताब्यातील वरील 23 किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते कोंढाण्यासारखा स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला जिंकून घेण्याचा शिवराय आटोकाट प्रयत्न करीत होते त्याच सुमारास तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा यांच्या लग्नाचे आमंत्रण शिवरायांना देण्यासाठी राजगडावर गेले होते महाराज कोंढाणा जिंकण्याच्या तयारीत आहेत हे समजताच  तानाजीने आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकण्याची आज्ञा करावी असा आग्रह धरला असे म्हणतात त्या प्रसंगी तानाजी म्हणाले "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे" तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाणा उर्फ सिंहगड कसा जिंकून घेतला याविषयी ऐतिहासिक साधनातून फारच थोडी माहिती उपलब्ध होते. तानाजी मालुसरे यांच्याबरोबर जेध्यांकडील काही लोक व मावळे मिळून ५०० लोक होते तानाजी १००० हशमांचे सुभेदार होते.  कोंढाणा जिंकला ... जिंकताना मुघल किल्लेदार उदयभान व तानाजी मालुसरे हे दोघेही मारले गेले तो दिवस म्हणजेच ४ फेब्रुवारी १६७० होता. 

काही काळ सिंहगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात हि होता . त्यांनतर इंग्रज जनरल्स स्मिथ याच्या हुकमावरून सिंहगडाला वेढा देऊन तोफांचा प्रचंड मारा करून इंग्रजांनी गड जिंकून घेतला इंग्रजांना गडावर 50 लक्षांची लूट मिळाली.  त्यामध्ये पाच लाख रुपयांचा सोन्याचा गणपती तसेच देवदेवतांच्या मूर्ती ज्या सिंहगडावर ठेवण्यात आल्या होत्या त्या इंग्रजांनी सिंहगडावरून लुटून नेल्या. 

लोकमान्य टिळकांनी चिंतन आणि लेखनासाठी सिंहगडाची निवड केली गडावर जागा विकत घेऊन एक बंगला बांधला याच बंगल्यामध्ये त्यांनी "गीता रहस्य" या महान ग्रंथाची लेखनप्रत तयार केली.  त्याचबरोबर "आर्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ ही साकार केला. सिंहगडावरच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांची भेट झाली होती. 


नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंहगडाला भेट दिली, त्याप्रसंगी कल्याण दरवाजामध्ये त्यांनी गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी शिवरायांवर रचलेले काव्य उस्फूर्तपणे मोठ्यांदा म्हंटले शिवरायांपासून प्रेरणा घेऊनच ही त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प केला. 


हजारो वर्षांच्या इतिहासाला साक्षीदार असणारा सिंहगड किल्ला आता मात्र  निसर्गाच्या कुशीत सुखाने विसावला आहे. या किल्ल्याने कितीतरी युद्ध पाहिली , युद्धाच्या कथा ऐकल्या असतील , राजे पाहिले असतील वैभव पाहिले असेल , कितीतरी आनंद आणि दुःखाचे क्षण या किल्ल्याने अनुभवले आणि सोसले असतील आणि हे सर्व सहन करून तो आजही थाटात उभा आहे आपल्याला आपला इतिहास सांगत आहे पण आपण त्याची काळजी घ्यायला आणि त्याला जपायला कमी पडत आहोत असे किल्ल्यावर फिरताना प्रत्येक क्षणी वाटत होते.  खरं तर महाराष्ट्र पर्यटन विभागाने जर काही उपक्रम या ठिकाणी राबवले तर कितीतरी बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महारष्ट्राबाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून भरपूर रोजगार मिळेल. किल्ल्यावर जे पाण्याचे साठे आहेत ते हि अगदी वाईट अवस्थेत आहेत. किल्ल्यावर काही ठिकाणी कचरा हि आढळून येत होता. प्रत्येक नागरिक आणि पर्यटकांची जबाबदारी आहे कि त्या त्या ठिकाणचे पावित्र्य आपण राखायला पाहिजे त्या ठिकाणाला योग्य तो आदर आपल्याला देता आला पाहिजे. आपला इतिहास आपण तरुण पिढीनेच जपायला पाहिजे.. या गोष्टी खरं सांगायच्या नाही तर प्रत्येकाने समजून घ्यायच्या आहेत. जे स्वातंत्र आज आपण उपभोगत आहोत ते सर्व आपल्या पूर्वजांमुळे त्यांनी वेगवेगळ्या काळात घडवून आणलेल्या क्रांतीमुळे. जर याची जाणीव असेल तर किमान अशा ठिकाणी गेल्यावर स्वछता राखण्याचा तरी संकल्प करा. 

धन्यवाद 
हेमा यादव-कदम 





 





 

(या व्हिडिओ मधील वाऱ्याचा आवाज नक्की ऐका )



 






गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

नात्यांच्या बदलत्या परिभाषा - लिव्ह इन - भाग १

 किती तरी हजारो वर्षांपूर्वी मानव प्राण्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आज पर्यंत अनेक युगे मागे पडत गेली रामायण झाले , महाभारत झाले , शिवकाळ लोटला , इंग्रज भारतात येऊन राज्य करून गेले एक ना अनेक गोष्टी घडल्या पण आपल्यासाठी हा आपल्या समाजाचा भूतकाळ आहे यातील कोणतीही गोष्ट या पिढीतील लोकांनी स्वतः अनुभवली नाही फक्त या सर्व गोष्टी आणि आपला प्रेरणादायी दायी इतिहास आपण वाचत आणि शिकत मोठे झालो ... संस्कार संस्कृती सर्व काही समजून घेत आयुष्याचा एक एक टप्पा पार करत चाललो आहोत. जंगलाचे आणि शहराचे नियम वेगळे असतात जंगलात काही हि चालते पण शहरात असे काही हि चालत नाही काही सुज्ञ लोकांनी समाज व्यवस्थित रहावा यासाठी काही नियमावली तयार केली व त्याप्रमाणे समाज वागू आणि जगू लागला .. त्या काळातील जातीभेद , स्त्रीपुरुष असमानता , बालविवाह , सतीप्रथा , हे सर्व काळानुसार बदलत गेले. विवाह पद्धती बदलत गेल्या फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादा असणारी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा जोडून काम करू लागली भ्रूण हत्या कमी झाल्या मुलींची संख्या देखील वाढली म्हणजे काळाप्रमाणे सर्व गोष्टी बदलत जातात आणि समाज हे बदल स्वीकारत पुढे जातो त्यामुळे समाजात येणाऱ्या नव नवीन संकल्पनांना समाजातील काही रूढीवादी लोक विरोध करणार आणि काही सुधारणावादी त्याचा विरोध मोडून काढणार आणि काळाची आजची गरज त्यांना पटवून देणार .. हेच  वर्षानुवर्षे होत आले आहे आणि होत राहणार आहे .. 

ज्याप्रमाणे काळ बदलत गेला त्याप्रमाणे स्त्री - पुरुष नाते देखील बदलत गेले. नात्यांच्या परिभाषा बदलत गेल्या पूर्वीची एक म्हण होती " नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडले तर तक्रार कुठे करायची " म्हणजे नवऱ्याचा मार खाणाऱ्या स्त्रीला ला कुठेही दाद मागता येत नव्हती पण आता स्त्रियांचे बाजूने इतके कायदे आहेत कि , मार तर सोडा पण शहरासारख्या ठिकाणी तर नवरे बायकांसोबत आवाज चढवून सुद्धा बोलू शकणार नाहीत .. कारण आता तक्रार करायला महिलांना हक्काची जागा आहे कायदे आहेत , महिला मुक्ती गट आहेत तसेच आर्थिक दृष्टया महिला बऱ्यापैकी सक्षम आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात . पुरुष हि ते समंजस पणे स्वीकारतात आता पूर्वीसारखे राहिले नाही काळाप्रमाणे सर्व काही बदलत चालले आहे. 

लिव्ह इन नावाची संकल्पना सध्या समाजात पसरत चालली आहे ., लिव्ह इन हि संकल्पना परदेशातून आली  असे  म्हणतात लिव्ह इन म्हणजे थोडक्यात विवाह न करता एकत्र नवरा बायको सारखे राहणे तसा मौखिक किंवा लिखित करार करणे. भारतात अजून याला कायदेशीर मान्यता नाही पण त्याला कायद्याचा विरोध देखील नाही. केस टु केस यात न्याय निवाडा केला जातो लिव्ह इन हि या काळाची गरज होत चालली आहे त्यामागे कारणे अनेक आहेत पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे घटस्फोट घेताना होणारा त्रास आणि वाया जाणारा वेळ त्यामुळे विवाह करण्यापेक्षा लिव्ह इन चा करार करून लिव्ह इन मध्ये राहण्याला लोक जास्त पसंती देताना दिसतात ज्यांचे वय ४० च्या पुढे आहे ते लोक या लिव्ह इन रिलेशनशिप ला खूप जास्त महत्व देताना दिसतात.  

 

शनिवार, १२ मार्च, २०२२

प्रेमाचा ओलावा हवा आहे ...

 

प्रेमाचा ओलावा हवा आहे ...



भरकटलेल्या आयुष्याला 

थोडा विसावा हवा आहे. 
उन्हात फिरताना वाऱ्यातील 
हलकासा गारवा हवा आहे 
थकलेल्या मनाला 
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ... 


हसत खेळत जगायला 
खंबीर सहवास हवा आहे 
माझ्यासाठी प्रचंड वेळ असणारा 
मित्र हवा आहे . . . 
थकलेल्या मनाला 
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ... 


एकटेपणातुन बाहेर काढणारा 
फक्त एकच हात हवा आहे  
निस्वार्थी पणे साथ देणारा 
एक आधार मला हवा आहे ... 
थकलेल्या मनाला 
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ... 


जगण्यासाठी कारण देणारा 
भास मला हवा आहे 
अजूनही आयुष्य शिल्लक असल्याचा 
विश्वास मला हवा आहे. 
थकलेल्या मनाला 
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
हेमा यादव

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

विचार आणि भावना

भावना या मनाशी निगडित असतात . तर विचार हे बुद्धीशी निगडित असतात , जो पर्यंत आपण आपल्या भावनेच्या कोशात अडकून असतो तो पर्यंत कोणत्याच विचारांना पाहायला गेले तर काहीच अर्थ नसतो . लोकसत्ता मध्ये मी या संधर्भात एक लेख वाचला होता त्यामधील काही भाग मी इथे share करीत आहे त्यात असे म्हंटले होते कि , 

 बुद्धीवर भावना कशी मात करते, हे मेंदूमध्ये प्रत्यक्ष तपासण्याचे काम ॅन्ड्र वेस्टन यांनी २००४ मध्ये केले. चर्चासत्रात, वादविवादात, व्यावसायिक चर्चेत वा घरगुती गप्पांमध्ये आपला मेंदू कसा काम करतो ते या संशोधनात समजते. " समोरच्या व्यक्तीला आपण समजून घेतो आहोत, त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहोत असे आपण मानतो. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी असते. आपला मेंदू नवीन माहिती ऐकायला तयारच नसतो. तो फक्त जुने मत अधिक पक्के करीत असतो."

(लोकसत्ता ऑक्टो १६,२०१२. .  ०७:१३ )

 खरं तर आपल्या मनाला जे वाटते तेच आपण करत असतो . उदा . खोटे बोलणे चूक आहे , चोरी करणे चूक आहे , कोणाचे मन कधी दुखावू नये ... .... हे झाले चांगले विचार पण हे विचार आचरणात आणणारे किती लोक आपण समाजात पाहतो .. मानवी मनात एखादी भावना निर्माण झाली कि , लगेच ती पूर्ण करण्यासाठी विचार पुढे येतात . आपल्या भावना आपल्याला कधीच चुकीच्या वाटत नाही . उलट आपल्याला किंवा आपल्या मनाला पटणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे योग्य आहेत आणि बरोबर आहेत हे सिद्ध करण्यासाठी विचारांचा आधार घेतला जातो. आपण स्वतः सोडून बाकी लोकांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी विचार कार्य करत असतात . 

 

उदा .

माझं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा एखादी व्यक्ती मला खूपच आवडते आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे ( हि झाली एक छान भावना स्वप्नरंजन ) 

 

आता आपले मन आपल्या बुद्धीला  सांगू लागते कि , मला ती व्यक्ती हवी आहे आता त्याला / तिला मिळवण्यासाठी आपले विचार आपली बुद्धी कामाला लागते . कधी कधी आपल्या विचारांना कळत असते कि ,काहि कारणास्तव प्रत्यक्षात हि गोष्ट होणे शक्य नाही. पण तरी देखील आपले मन आपल्या भावना हे स्वीकारायला तयार नसतात. 

 

) ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते

) त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल का ?  

) त्या व्यक्तीला आयुष्यात काय हवे आहे ?

) त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र आयुष्य आहे , त्या व्यक्तीला आपल्या पेक्षा वेगळे हि काही हवे असेल?

) आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये बसतो का

) फक्त आपण प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे का

 हे आणि असे कोणतेही प्रश्न आपल्याला तो पर्यंत पडत नाहीत जो पर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला नकार देत नाही याचे कारण फक्त इतकेच आहे कि विचारांची कवाडे बंद करून आपण भावनांना महत्व देतो आणि कधी कधी मृगजळाच्या मागे उगीचच धावत राहतो . थोडक्यात काय तर भावना , मन हे आपल्या विचारांवर नेहमी प्रभाव पडतात आणि त्यामुळे आपण काही हि नवीन स्वीकारायला तयार नसतो पण जर आपण विचारांना महत्व दिले आणि भावनांना थोडे नियंत्रणात ठेवले तर आपले आयुष्य आहे त्या पेक्षा खूप छान होऊ शकते .. इतरांचे विचार ऐकून त्या विचारांवर सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन विचार करा . योग्य काय ? अयोग्य काय ? याचा जास्त किस पडता प्रत्येक गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाही तर विचारांची कवाडे उघडी ठेऊन समजून घ्या ... थोडे कठीण आहे पण अशक्य नाही ..