यावर्षी असे ठरवले कि, जरा महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा अभ्यास करूया. आणि इतिहासाचे वर्तमान रूप पाहूया !
कारण ज्या राज्यात आपला जन्म झाला किमान त्या राज्याचा इतिहास तरी आपल्याला माहिती असायला हवा असे मला वाटले त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला पुण्याजवळ किमान २१ ते २२ किल्ले आहेत असे लक्षात आले. मग सर्वात आधी सुरवात करायचे ठरले ते माझ्या घरापासून अगदी जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्या पासून आणि मग आमची स्वारी निघाली इतिहासात डोकावण्यासाठी ....
सिंहगड किल्ल्या पर्यंत पोहचण्याचा रस्ता अतिशय सुंदर आहे जाता जाता खडकवासला हे सुंदर धरण तुमचे मन वेधून घेते तिथे थोडा वेळ थांबून तुम्ही पुढे निघू शकता, किल्ल्याच्या पायथ्यापाशी पार्किंग ची सोय आहे तिथे गाडी पार्क करून तुम्ही चालायला सुरवात करू शकता किल्ल्याच्या आत प्रवेश करताच क्षणी वन विभागाने या किल्ल्याशी संबधित नकाशा लावून ठेवला आहे त्यावरून किल्ल्यावर पाहण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत याचा अंदाज तुम्हाला येतो. पुणे दरवाजा , कल्याण दरवाजा , नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी , राजाराम महाराज यांची समाधी , खुला रंगमंच , तानाजी कडा , कलावंतिणी बुरुज , लो . टिळक यांचा बंगला , अमृतेश्वर मंदिर, कोंडेश्वर महादेव मंदिर याच सोबत अजूनही काही ठिकाणे आहेत.
दगडी पायऱ्या , मोठे दरवाजे , दगडी कमानी , पाहताना मनात सहज विचार येतो कि विटा सिमेंटची घरे बांधताना आपल्याला शहरासारख्या ठिकाणी इतक्या अडचणी येतात तर त्या काळात पुरेशा सोयी उपलब्ध नसताना इतके उत्कृष्ट बांधकाम कसे केले असेल. या दरवाजा नविषयी देखील काही माहिती किल्ल्यावर मिळाली.
गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा पहिला दरवाजा येतो तो पुणे दरवाजा यालाच डोणजे दरवाजा असे देखील म्हणतात. मात्र हा एकच दरवाजा नसून असे एका मागोमाग एक तीन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शिल्पे आहेत. १/७/१६९३ रोजी बावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्थ करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला. या गोष्टीला 300 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिलालेख ही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभ पूर्वक बसविला आहे. या पहिल्या दरवाजातून आत आले की, थोड्याच उंचावर एक दरवाजा आहे तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक दोन या दरवाजासंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही.
पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा हा फारच महत्त्वाचा आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळांवरून गडाचा थेट संबंध तेराव्या शतकातील यादव काळाशी लागतो देवगिरीच्या यादवांच्या काळात विस्तृत सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर यादवांचे साम्राज्य होते आणि गडावरून यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला तरी हा दरवाजा मात्र यादवांच्या काळातच बांधला गेला असावा असे अनुमान देखील येथील रचनेवरून काढता येते.
कोंढाणा उर्फ सिंहगड ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने ओळखला जातो त्यांच्या बद्दल हि जाणून घेऊ.
नरवीर तानाजी मालुसरे यांची विश्वसनीय अशी फारशी माहिती आपणास उपलब्ध होत नाही. ऐकिव माहिती वरून तानाजी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यांपैकी पाचगणी गावच्या पूर्वेस सुमारे दोन मैलांवर असलेल्या गोडवली गावचे राहणारे होते परंतु काही कारणाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील उमराठे नावाच्या गावात येऊन राहिले होते. महाराजांनी त्यांना त्या भागात लुटा-लूट व दरोडे घालणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली होती. कवी परमानंदांच्या शिवभारतात तानाजी मालुसऱ्यांविषयी काही विश्वासनीय माहिती दिली आहे. त्यानुसार अफजलखानास शिवाजी महाराजांनी मारताच नगाऱ्यांचा इशारा करण्यात आला. शिवरायांच्या सूचनेप्रमाणे एक एक हजार पायदळ घेतलेले पाच सरदार शत्रूंवर तुटून पडले त्यापैकी एक तानाजी मालुसरे होते. शिवाजी महाराजांनी कोकणातील दाभोळ, पाली , शृंगारपूर , चिपळूण, संगमेश्वर या भागांवर केलेल्या स्वारीत त्यांच्याबरोबर पायदळाचा सेनापती म्हणून तानाजी मालुसरे सहभागी होते या मोहिमेत शृंगारपूरचा राजा सूर्याजीराव यांच्याशी झालेल्या युद्धाचे नेतृत्व तानाजी मालुसरे करीत होते. याप्रसंगी एक हकीकत घडली होती महाराजांचा सरदार निळकंठ राव हा सूर्याजीच्या हल्ल्याला घाबरून पळू लागला हे पाहताच तानाजी ने त्याचा धिक्कार करून त्यास एका दगडाला बांधून ठेवले तानाजीं मालुसरे यांनी सूर्याजी राव शृंगारपूरकर यांच्याशी रात्रभर युद्ध करून त्यांचा पराभव केला सूर्याजी पराभूत होऊन पळून गेला हि बातमी शिवरायांना समजताच त्यांनी तानाजी मालुसरे यांचा मोठा गौरव केला होता.
नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात आणला ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील दैदिप्यमान आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे मिर्झाराजा जयसिंग याच्याशी झालेल्या पुरंदराच्या तहात जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंढाणा हा महत्त्वाचा किल्ला होता. आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवरायांनी मुघलांच्या ताब्यातील वरील 23 किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते कोंढाण्यासारखा स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला जिंकून घेण्याचा शिवराय आटोकाट प्रयत्न करीत होते त्याच सुमारास तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा यांच्या लग्नाचे आमंत्रण शिवरायांना देण्यासाठी राजगडावर गेले होते महाराज कोंढाणा जिंकण्याच्या तयारीत आहेत हे समजताच तानाजीने आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकण्याची आज्ञा करावी असा आग्रह धरला असे म्हणतात त्या प्रसंगी तानाजी म्हणाले "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे" तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाणा उर्फ सिंहगड कसा जिंकून घेतला याविषयी ऐतिहासिक साधनातून फारच थोडी माहिती उपलब्ध होते. तानाजी मालुसरे यांच्याबरोबर जेध्यांकडील काही लोक व मावळे मिळून ५०० लोक होते तानाजी १००० हशमांचे सुभेदार होते. कोंढाणा जिंकला ... जिंकताना मुघल किल्लेदार उदयभान व तानाजी मालुसरे हे दोघेही मारले गेले तो दिवस म्हणजेच ४ फेब्रुवारी १६७० होता.
काही काळ सिंहगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात हि होता . त्यांनतर इंग्रज जनरल्स स्मिथ याच्या हुकमावरून सिंहगडाला वेढा देऊन तोफांचा प्रचंड मारा करून इंग्रजांनी गड जिंकून घेतला इंग्रजांना गडावर 50 लक्षांची लूट मिळाली. त्यामध्ये पाच लाख रुपयांचा सोन्याचा गणपती तसेच देवदेवतांच्या मूर्ती ज्या सिंहगडावर ठेवण्यात आल्या होत्या त्या इंग्रजांनी सिंहगडावरून लुटून नेल्या.
लोकमान्य टिळकांनी चिंतन आणि लेखनासाठी सिंहगडाची निवड केली गडावर जागा विकत घेऊन एक बंगला बांधला याच बंगल्यामध्ये त्यांनी "गीता रहस्य" या महान ग्रंथाची लेखनप्रत तयार केली. त्याचबरोबर "आर्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ ही साकार केला. सिंहगडावरच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांची भेट झाली होती.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंहगडाला भेट दिली, त्याप्रसंगी कल्याण दरवाजामध्ये त्यांनी गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी शिवरायांवर रचलेले काव्य उस्फूर्तपणे मोठ्यांदा म्हंटले शिवरायांपासून प्रेरणा घेऊनच ही त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प केला.
हजारो वर्षांच्या इतिहासाला साक्षीदार असणारा सिंहगड किल्ला आता मात्र निसर्गाच्या कुशीत सुखाने विसावला आहे. या किल्ल्याने कितीतरी युद्ध पाहिली , युद्धाच्या कथा ऐकल्या असतील , राजे पाहिले असतील वैभव पाहिले असेल , कितीतरी आनंद आणि दुःखाचे क्षण या किल्ल्याने अनुभवले आणि सोसले असतील आणि हे सर्व सहन करून तो आजही थाटात उभा आहे आपल्याला आपला इतिहास सांगत आहे पण आपण त्याची काळजी घ्यायला आणि त्याला जपायला कमी पडत आहोत असे किल्ल्यावर फिरताना प्रत्येक क्षणी वाटत होते. खरं तर महाराष्ट्र पर्यटन विभागाने जर काही उपक्रम या ठिकाणी राबवले तर कितीतरी बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महारष्ट्राबाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून भरपूर रोजगार मिळेल. किल्ल्यावर जे पाण्याचे साठे आहेत ते हि अगदी वाईट अवस्थेत आहेत. किल्ल्यावर काही ठिकाणी कचरा हि आढळून येत होता. प्रत्येक नागरिक आणि पर्यटकांची जबाबदारी आहे कि त्या त्या ठिकाणचे पावित्र्य आपण राखायला पाहिजे त्या ठिकाणाला योग्य तो आदर आपल्याला देता आला पाहिजे. आपला इतिहास आपण तरुण पिढीनेच जपायला पाहिजे.. या गोष्टी खरं सांगायच्या नाही तर प्रत्येकाने समजून घ्यायच्या आहेत. जे स्वातंत्र आज आपण उपभोगत आहोत ते सर्व आपल्या पूर्वजांमुळे त्यांनी वेगवेगळ्या काळात घडवून आणलेल्या क्रांतीमुळे. जर याची जाणीव असेल तर किमान अशा ठिकाणी गेल्यावर स्वछता राखण्याचा तरी संकल्प करा.
धन्यवाद
हेमा यादव-कदम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा