फॉलोअर

रविवार, २४ जुलै, २०२२

Malhar gad मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला

 मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला. 

निर्मिती इ.स. १७५७ ते १७६०

भीवराव पानसे तोफखाना प्रमुख यांनी बांधलेला किल्ला 

पुणे जिल्ह्यातील सासवड या सुप्रसिद्ध गावाजवळ मल्हारगड हा मराठेशाहीतील बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो, या किल्ल्याची उंची ३१६६ फूट इतकी आहे आणि गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.  पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड  आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर , वज्रगड, मल्हारगड, सिंहगड  हे किल्ले याच रांगेवर आहेत.  दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.  

किल्ल्यावर आजही पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे  खंडोबा मंदिर, महादेव मंदिर, आणि दोन विहिरी आहेत. बाकी चौकोनी आकाराचा तट अजूनही तिथे आहे चालत जाण्यासाठी  हा गड अगदी सोपा आहे येथील चोर दरवाजा देखील अजून चांगल्या स्थितीत आहे. चोर दरवाजा पर्यंत गाडी जाते. त्यामुळे अगदी अर्ध्या तासात आपण गडावर पोहचतो. गडावर मानाने आणि रुबाबात फडकणारा भगवा तुमचे लक्ष वेधून घेतो. या गडावर थोरले माधवराव पेशवे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहकार्‍यांनीही गनिमी काव्याने लढण्यासाठी व इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी या गडाचा आश्रय घेतला होता. 

निसर्गाच्या कुशीत आजही या गडाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे . विविध पक्षी देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.

प्रत्येक गड किल्ला आपल्याला आपला रंजक इतिहास सांगण्यासाठी उभा आहे , या गड किल्ल्याचे संवर्धन करणे आपले म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. 



महादेव मंदिर 



किल्ल्याचा मुख्य दरवाजा 

बुरुज 


चोर दरवाजा 

विहीर 


खंडोबा मंदिर (सध्याची अवस्था)

धन्यवाद 
हेमा यादव-कदम 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा