आपल्या सारख्या सर्व शहाण्या लोकांनी मिळून समाज बनला आणि या समाजात कटुंब व्यवस्था हि आपल्या सारख्या सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या लोकांनीच जन्माला घातली. लोकांनी जनावरासारखे वागू नये माणूस म्हणून जगावे यासाठी संस्कार नावाची गोष्ट तयार झाली. पाप - पुण्य , चांगले - वाईट , खोटे - खरे असे वेग-वेगळे शब्द अर्थांसहित उदयाला आले... हे सर्व कधी पासून आहे., हे खूप लोकांना माहित नाही माणसाचे आयुष्यमान पाहिले तर फक्त ६० - १०० वर्ष त्यात पण अनेक कर्तव्य अनेक नाती जपत आपण जगत असतो ... बऱ्याचदा मन मारून हि जगतो .. का वागतो आपण असे याचा कधी आपण विचार केला आहे का ? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच घटनांना आपण स्वतः कारण नसताना तासनतास चघळत बसतो .. कुटुंबातील लोकांवर भरपूर हक्क दाखवतो आणि ते दाखवत असताना आपण हे विसरून जातो कि समोरच्या व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व आहे आणि आपण जरुरी पेक्षा जास्त अधिकार गाजवणे हे कोणाच्याही हिताचे ठरणार नाही . समोरच्याने आपले ऐकले नाही कि आपला स्वाभिमान दुखावला जातो. आपल्याला त्रास होतो .. आई वडिलांना असे वाटते आमच्या पेक्षा मुलांचे कोणी चांगले करूच शकत नाही, तर बायको ला वाटते कि माझ्याशिवाय माझ्या नवऱ्याला कोणी सांभाळू शकत नाही , नवऱ्याला वाटते कि माझी बायको फक्त माझ्या कुटुंबाची सेवेकरी आहे., आणि तिचे काय हवे नको ते पाहणे माझे कर्तव्य आहे .. भावाने कसे वागावे , बहिणीने कसे वागावे ., आपल्या समाजात प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तिरेखा या वर्षानुवर्षे कोणीतरी ठरवून दिलेल्या आहे आणि त्यात थोडे कुठे काही खट्ट झालं कि , भांडण सुरु ...
प्रत्येक नात्यातील व्यक्तीला माणूस म्हणून आपण कधी पाहायला शिकणार. आपल्याकडे कितीतरी महिला आणि पुरुष असे आहेत कि त्यांनी सर्वस्व कुटुंबाला, नात्यांना वाहून दिले आहे पण कधी त्यांना कोणी विचारले हि नाही कि , बाबारे किंवा बाई ग तुला तुझ्या आयुष्यात काय हवं आहे , आमच्यासाठी तू आयुष्य वेचत आहेस तू स्वतःसाठी काय केलं .. स्वतःसाठी किती वेळ दिला . तुझ्या मनाला जसे जगावेसे वाटते तसे तू जगत आहेस का ? पण याउलट जर कोणी भूमिकेच्या विरोधात थोडे काही केले कि मग प्रश्नांचा भडीमार सुरु होतो .. हेच का संस्कार , तू असे वागण्याची हिम्मत च का केली? इत्यादी .. इत्यादी ... प्रत्येक नात्याच्या एका ठरलेल्या भूमिकेबाहेर कोणी वागण्याचा प्रयत्न केला कि , त्याला गुन्हेगार ठरवून सर्व लोक दोष देतात ...
स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या आपल्या सर्वाना हे कधी कळणार कि, इतरांची वागणूक चांगली कि वाईट हे ठरवणारे आपण कोणीही नाही... आपण त्या व्यक्तीच्या भूमिकेत असतो तर आपण कसे वागलो असतो. आपण अगदी सहज म्हणतो "तुझ्यावर जी परिस्थिती आली ना ती माझ्यावर आली असती तर मी खूप चांगला मार्ग काढून बाहेर पडलो असतो / असते ..." पण खरंच शांतपणे विचार करा हे बोलणे जितके सोपे आहे तितके वागून दाखवणे खरंच सोपे आहे का ? कदाचित तुमच्यावर जर काही प्रसंग ओढवला असता खरंच , तर तुमच्यातील फाजील अति आत्मविश्वासामुळे तुम्ही अजूनहि जास्त अडकला असतात .. वेळ सांगून येत नाही . कुटुंबातील व्यक्ती तुमची बायको / नवरा असो , आई - वडील असो , मुलं असो , भावंडं असो , नातेवाईक असो , नात्याचे नाव काहीही असुद्या पण त्या नात्याच्या भूमिकेबाहेर जाऊन समोरच्या व्यक्तीला एक वेगळे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून पहा . त्यांच्या आवडीनिवडीना चूक किंवा बरोबर च्या पारड्यात न बसवता त्या व्यक्तीची गरज म्हणून पहा.. स्वतःला त्या जागी ठेऊन पहा .. शांतपणे मार्ग काढा ... कुटुंबात वाद विवाद टाळा आणि प्रत्येक व्यक्तीचे मन समजून घ्या.. भूमिकेबाहेर त्या व्यक्तीला स्वतःचे आयुष्य आहे हे समजून घ्या ....... कुटुंबातील प्रत्येकाला त्याची स्पेस द्या .. नात्यांना भूमिकेच्या ओझ्याखाली गुदमरून टाकू नका .. प्रत्येकाला स्वतःचे चांगले - वाईट कळते त्यामुळे अवास्तव हक्क गाजवून निर्णय लादू नका .. नाहीतर नाती फक्त नावापुरती उरतील आणि त्यातील प्रेम हे फुलातील सुंगध आणि नाजूक पाकळ्यांप्रमाणे वादळासोबत उडून खूप दूर निघून जाईल मग उरतील फक्त केविलवाण्या आठवणी ..
आपल्या प्रत्येकात असणारा पण न दिसणारा महत्वाचा भाग म्हणजे " मन " जे दिसत नसतानाही आपल्या जीवनमानावर खूप परिणाम घडून आणत असते .. आपले यश , अपयश , आरोग्य , व्यक्तिमत्व सर्व गोष्टीवर मनाचा प्रभाव असतो. लोक म्हणतात कि माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचे " मन " मराठीत एक म्हण आहे "जे मन चिंती ते वैरी ना चिंती, "मैत्री मनाशी" या ब्लॉग मध्ये आपण आपल्या मनाशी मैत्री करून जीवनात किती सकारात्मक बदल करू शकतो? याबद्दल बोलणार आहे , ब्लॉग आवडला तर नक्की share करा.
फॉलोअर
सोमवार, २० डिसेंबर, २०२१
नात्यांमध्ये बांधलेल्या व्यक्तीला जगण्याचे स्वातंत्र नसते का ?
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१
" शब्दांचे कोडे मांडून स्वतःच्या भावनांशी खेळू नका ... "
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१
आधी स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर द्या.
कधीही जाणून घेत नाही पण त्या व्यक्तीने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून त्याचा राग - राग आपण नेहमी करतो. माझी सर्व मित्र - मैत्रिणींना विनंती आहे कृपया विनाकारण आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नका .. तटस्थ पणे जगायला शिका .. जर कोणी तुमची अपेक्षा पूर्ण नाही करू शकत असेल तर त्यावर रागवण्याआधी हा विचार करा कि माझ्याकडून पण लोक अपेक्षा करत असतील मी किती लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या..? बर लोकांच्या सोडा मी स्वतःच्या तरी अपेक्षा केल्या का पूर्ण ? जर याचे उत्तर नाही असे मिळाले तर यापुढे कृपया कोणी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून त्यावर रागावू नका. त्यांची भूमिका समजून घ्या. या जगात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचारधारेची असते. फक्त तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणी जन्म नाही घेतला.. म्हणून अपेक्षा फक्त स्वतःकडून करायच्या... आणि योग्य नियोजन करून स्वतःची स्वप्न पूर्ण करा .
जगण्याचा खरा आनंद वर्तमानात दडलेला असतो.
" प्रत्येक
व्यक्तीला असेच वाटत असते कि ,
आयुष्यात सर्व गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे घडायला पाहिजे, आणि मनाप्रमाणे सर्व घडले
कि ,आपण
आनंदी असतो , पण
मनाविरुद्ध थोडे जरी काही झाले तरी मन खट्टू होते. मग आपण स्वतःसोबत आपल्या
आजूबाजूच्या लोकांचाही वेळ कळत नकळतपने खराब करून टाकतो, एक गोष्ट लक्षात घ्या कि
आपला आनंद हा फक्त आपल्या हातात असतो इतर कोणामुळेही आपण कधीही आनंदी किंवा दुखी
होऊ शकत नाही. आपण जेव्हा त्रासात किंवा दुःखात असतो तेव्हा जे लोक आपल्यावर प्रेम
करतात ते आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपण तेवढ्यापुरते
त्यांच्यासमोर आनंद व्यक्त हि करतो पण ते गेल्यावर पुन्हा आपल्या कोशात जाऊन बसतो.
आपल्या भोवती तयार केलेला नैराश्याचा कोष आणि दुःख या दोन्ही गोष्टीतून आपण
तोपर्यंत बाहेर येऊ शकत नाही जोपर्यंत आपली त्यातून बाहेर पडायची मनापासून इच्छा
नाही.. आपल्या विचारांमध्ये जर स्पष्टता नसेल तर आपल्याला आनंद कधी भेटणारच नाही.
आनंद हि विकत मिळणारी गोष्ट नाही आणि ती कोणी भेटवस्तू म्हणून पण तुम्हाला देणार
नाहीये .. तुमचा आनंद तुमच्याच हातात आहे. समजून घ्या कि , इच्छा, अपेक्षा, आणि गरजा या कधीच संपत
नाहीत , म्हणून
आनंद नक्की कोणत्या गोष्टीत आहे हे योग्य वेळेतच कळायला पाहिजे.
मला वाटते कि , जगण्याचा खरा आनंद
वर्तमानात दडलेला असतो. त्यामुळे आपण वर्तमानात जगणे शिकायला पाहिजे."
भविष्याचा विचार करून वर्तमान खराब होणार नाही" याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वर्तमानातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भरभरून वाहत असतो. पण तुम्हाला
ते क्षण वेचण्याची कला अवगत होणे आवश्यक आहे . तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टी
चांगल्या आहेत कि वाईट याचा विचार न करता त्या एक अनुभव म्हणून पाहून सोडून द्या
.. घटना घडली कि विषय संपला जीवनाच्या प्रवासात ज्या गाडीतून आपण प्रवास करत आहोत
त्या गाडीला यु टर्न नसतो. त्यामुळे आनंदी राहायचे असेल तर कोणत्याही घटनेचा किस
पाडत बसू नका कारण तुमच्या चिंतनाने कोणतीही चुकीची गोष्ट बरोबर होणार नाही आणि
बरोबर गोष्ट चूक होणार नाही. फक्त वेळ वाया जाईल. त्यामुळे घडलेल्या गोष्टी आणि
घटना तिथल्यातिथे सोडून देण्याची सवय स्वतःला लावा. जर वर्तमानात जगणे आपण शिकलो
तर भूतकाळ रम्य आणि भविष्यकाळ उज्ज्वल होतो.
माणसाच्या १०० वर्षाच्या
आयुष्यात शेवटचा क्षण कधी येईल हे माहित नसते. म्हणून प्रत्येक क्षण शेवटचा समजून
भरभरून जगून घेता यायला पाहिजे,
काय माहित? पुढचा
क्षण आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे. खर तर जगण्यातला खरा आनंद हा आपल्या
विचारांमध्ये असतो. विचार जितके परीपक्व तितके तुम्ही आनंदी राहू शकता .
विचारांमध्ये गोंधळ उडाला कि मग आनंद थोडा बाजूला पडतो म्हणून "विचार आणि
भावना" यातील फरक तुम्हाला कळणे फार आवश्यक आहे "आनंदी राहण्यासाठी
प्रत्येक आलेल्या क्षणांचे, अनुभवांचे
विश्लेषण करणे सोडून द्या." मिळालेले क्षण चांगले आहेत, कि वाईट आहेत हे ठरवण्यात
वेळ वाया घालवू नका. आनंदी रहा तुमचा आनंद तुमच्या विचारात दडलाय शोधा म्हणजे
नक्की सापडेल .....
"आयुष्याकडून तुम्हाला काय पाहिजे "समस्यांचा डोंगर कि यशाचे शिखर "
स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्या पण आपल्याला खूप मोठ्या
वाटत असतात त्याचे कारण इतकेच आहे , आपल्याला स्वतःला समस्यांचा बाऊ करायला आवडते , आपल्याला लोकांनी दिलेले
अटेन्शन आवडते . पण आपल्या या सवयीमुळे लोकांसाठी आपण सहानुभूतीचा विषय बनतो आणि
त्याच बरोबर आपण अपयशाच्या दिशेने ना कळत पाऊले उचलू लागतो इतरांवर अवलंबून
राहण्याची आपली मानसिकता वाढीस लागते . लक्षात घ्या जसा आनंद आपल्या आयुष्यात येतो
तसे दुःख हि आपल्या आयुष्यात येते ., समस्या येणे म्हणजे आपण काहीतरी काम करत आहोत याचे ते लक्षण आहे .
नुसत्या बसून राहणाऱ्या व्यक्तीला समस्या येत नाही .. जर आपल्याला कोणी समजवायला
गेले कि आपण सहज म्हणतो,
"हि वेळ तुझ्यावर आली असती ना मग तुला कळले असते" तुम्हाला काय
वाटते तुम्हाला समजावणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात एक हि समस्या आली नसेल का ? वाईट वेळ प्रत्येकावर येते
पण त्यातून यशस्वीरीत्या बाहेर कसे पडायचे हे आपल्या हातात असते.
कोणतीही समस्या आपोआप आयुष्यात येत नाही. आपण ती
समस्या स्वतः स्वतःच्या आयुष्यात ओढून आणलेली असते. हे विधान वाचल्यावर तुम्ही
नक्की म्हणाल कि , "आम्हाला
काही हौस नाही समस्या ओढवून आणायची " पण तुम्ही खरचं कळत नकळत पणे समस्या
स्वतःहून ओढवून आणता .. आपल्या मनात सतत येणारे नकारात्मक विचार याला कारणीभूत
असतात. आपल्या आयुष्यात आपण त्या गोष्टीचा विचार जास्त करतो जे आपल्याला नको आहे.
आणि नंतर आपण म्हणतो कि मला हवे तसे काही होतच नाही.. तुमच्या नकारात्मक विचारांमुळे
ते कधी होणार हि नाही.
.
उदा. मी जे काम करत आहे त्यात जर मी अपयशी झाले किंवा झालो तर काय
होईल. हा विचारच तुम्हाला अपयशी करून टाकतो . तुमच्या मनात असा विचार यायला पाहिजे
कि मी हे काम करत आहे आणि यात मला १००% यश मिळणारच आहे.. हा सकारात्मक विचार तुम्हाला
यशस्वी व्हायला मदत करतो . आणि मानसशात्रज्ञानी सिद्ध केले आहे. त्यामुळे मनाला
सकारात्मक विचार करण्याची सवय लावणे आवश्यक आहे . .
कोणतीच समस्या मोठी नसते कारण घडणाऱ्या गोष्टी या घडतच राहणार आहेत.
त्यामुळे इतरांच्या जीवनात काही समस्या नाहीत फक्त माझ्याच आयुष्यात समस्या आहेत
अशी इतरांशी तुलना करणे प्रथम सोडून द्या. तुम्ही फक्त तुमच्या विचारांवर लक्ष
केंद्रित करा. तुम्हाला काय पाहिजे याचा विचार करा , एकदा तुम्ही यात सक्षम झालात कि कुटुंबाच्या तसेच
इतर सर्वांच्या आयुष्यात तुम्ही आनंद निर्माण करू शकाल.
तुम्ही ऐकले असेल घरातील ज्येष्ठ लोक नेहमी म्हणतात " बाळांनो
वास्तू नेहमी तथास्तु " असे म्हणत असते ., त्यामुळे नकारात्मक विचारांना हळू हळू मनातून काढून टाकण्याची सवय
मनाला लावा
हा लेख वाचणाऱ्या लोकांपैकी किती लोकांनी लेखक “रॉन्डा बर्न” यांचे रहस्य -
" द सिक्रेट " हे पुस्तक वाचले मला कल्पना नाही पण जर हे पुस्तक कोणी
वाचले नसेल तर जरूर वेळात वेळ काढून वाचा तुम्हाला तुमचे विचार सकारात्मक कसे
करायचे हे कळेल. तुम्ही ठरवा तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे आणि आज पासून फक्त
त्याचाच विचार करा. मनात जी असंख्य विचाराची मालिका चालू असते त्याला बंद करण्याचा
प्रयत्न करा . यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्राणायाम , योगसाधना ज्यामुळे तुम्हाला
तुमचे विचार नियंत्रणात आणायला मदत होते. सर्वाच्याच आयुष्यात समस्या असतात पण
त्यातून हसत हसत साकारत्मकेतने मार्ग काढायचा कि इतरांशी तुलना करत बसून रडत रडत
जगून आयुष्याची वाट लावायची हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या हातात असते..... ठरवा
आता आयुष्याकडून तुम्हाला
काय पाहिजे "समस्यांचा डोंगर कि यशाचे शिखर "
धन्यवाद
हेमा यादव कदम
७८७५५५०७८९
" आई वडिलांची खरी किंमत अनाथ आश्रम मधील मुलांना विचारा "
काही दिवसांपूर्वी मी एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती. त्या आश्रम मध्ये साधारण ७०-८० इतकी लहान मुले होती. अगदी वय वर्ष ४ ते १४-१५ वर्षापर्यंत वय असणारी ... आश्रम नामांकित असल्याने तसे मुलांसाठी सोयी सुविधा व्यवस्थित होत्या. त्यांची तिथे अगदी घरातल्यासारखी काळजी घेतली जाते. कोणत्याही भौतिक गोष्टीची उणीव तिथे नाही.. पाहणाऱ्यांना किंवा दान देणाऱ्या पवित्र हातांना हे चित्र सुखद दिसत होते. तिथे माझ्यासमोर एक घटना घडताना मी पाहत होते आणि त्या घटनेने मी थोडे फ्लॅशबॅक मध्ये गेले. तीच घटना मला share करावीशी वाटली जरूर वाचा कदाचित तुम्हाला हि कळत नकळत काही गोष्टींची जाणीव होईल.
माझ्या आधी त्या आश्रमात एक आई-बाबा आपल्या लहान मुलीचा वाढदिवस तिथे साजरा करायला आले होते. सर्व लहान मुलांसोबत तिचा वाढदिवस छान साजरा झाला सर्वानी तिला भरपूर शुभेच्छा हि दिल्या. आश्रमाबाहेर पडल्यानंतर त्या लहान मुलीने रस्त्यावर एक खेळणी विकणारा माणूस पाहिला आणि तिने हट्टच केला कि तिला ती खेळणी हवी आहेत. तिच्या वडिलांनी लगेच आपल्या राजकन्येचा हट्ट पुरविला. आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई - बाबा दोघेही सुखावले. हा प्रसंग माझ्यासोबत आश्रमा मधील एक छोटा मुलगा हि आश्रम च्या गेट मध्ये उभा राहून पाहत होता. त्यावेळी त्याच्या चिमुकल्या डोळ्यात मला काहीतरी असे दिसले कि क्षणात मला माझे बालपण आठवले.
मला माझे "दादा-मम्मी " आठवले (मी माझ्या वडिलांना दादा म्हणते) माझं बालपण माझ्या आई वडिलांमुळे खूप छान गेले मला कोणत्याही गोष्टीची त्यांनी कमी पडू दिली नाही ते खूप श्रीमंत होते असे नाही पण माझे सर्व हट्ट जे त्यांना पुरविता येणे शक्य होते ते दोघांनी मिळून ते पुरविले. आज वयाच्या ३५ व्या वर्षी सुद्धा बऱ्याच कामांसाठी मी माझ्या दादांवर अवलंबून असते . मला ते सर्व क्षण आठवले जे मी माझ्या आई वडिलांसोबत जगले. मी केलेले हट्ट , घाबरल्यावर धावत पळत त्यांच्याकडे जाणे , कधी कधी रुसून बसणं , मग त्यांनी प्रेमानी काढलेली समजूत आजही आठवते. आपण आई वडिलांसोबत तसेच आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कसेही वागत असतो किंबहुना आपण त्यांना गृहीतच धरत असतो .. कधी कधी आपण त्यांना नको इतके दुखावतो. त्यांना समजून घेत नाही. कळत नकळत पणे माझ्याकडून हि असे झाले असेलच!
मी विचार करू लागले कि,
जर या मुलांना रात्री भीती वाटली तर ती मुले कोणाच्या कुशीत जात असतील. हट्ट करावासा वाटला तर कोणाकडे करत असतील , त्यांना कोणी फिरायला घेऊन जात असेल का ? त्यांना रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळे खावे असे कधी वाटत असेल का ?
त्यांना रंग कोणते आवडतील असतील? त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे हे ठरवता येत असेल का ? त्यांना या संधर्भात कोण मार्गदर्शन
करत असेल ? शिक्षण सोडा पण साधे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कपडे निवडायची संधी मिळत असेल का ? या विषयी त्यांना काय वाटत असेल ? कितीहि भौतिक गोष्टी मिळाल्या तरी आई - बाबांच्या प्रेमाची , आपुलकीची , काळजीची , त्यांना ओढ वाटत नसेल का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात गोधळ घालू लागले. या गोष्टी जरी ऐकायला जरी छोट्या वाटत असतील तरी यामागील भावना खूप मोठ्या आहेत. महत्वाच्या आहेत बालपणीचे क्षण, जीवन खूप मोलाचे असते. हे जीवनच कोणाला अनुभवायची संधीच मिळाली नाही तर
... या विचारानेच आणि मम्मी - दादांच्या आठवणीने चटकन डोळ्यात पाणी आले. मम्मी - दादा शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.
आई - वडिलांसाठी त्यांची मुले त्यांचा स्वाभिमान असतात त्यांचा जीव असतात. आपल्या मध्यम तसेच उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात मुले - मुली हे आई बाबांचे सर्वस्व असतात. मुलांच्या अवतीभवती च आई - बाबांचे आयुष्य फिरत असते....
पण कितीतरी मुलांना आई-वडील जी काळजी करतात त्याची कटकट वाटते.... त्यांच्या अपेक्षा म्हणजे ओझे वाटते. पण कधी त्यांच्या बाजूने तुम्ही विचार करून पाहिलात का ? कि , ज्यांनी आपल्याला जीवन दिले ते आपल्या वाईटाचा विचार कधीच करू शकत नाहीत मग त्याचे कोणत्याही विषयावरचे मत समजून न घेता किंवा त्यांना आपला दृष्टिकोन भविष्याच्या दृष्टीने कसा योग्य आहे हे समजून न सांगता " तुम्हाला काही कळत नाही., माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करू नका ., मला माझी स्पेस द्या.
" हे म्हणायची काय गरज असते. लहानपणी आपण हट्ट केले कि ते आपल्याला समजून सांगत होते आणि आपल्याला ते पटत हि होते. मग जर उतारवयात ते काही हट्ट करतात तर त्यांना न रागवता आंपण स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक त्यांना समजून घेऊ शकत नाही का ? या वर जरूर विचार करा. उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा सुलट पद्धतीने तुमचे विचार मांडा..
ज्यांना आई वडील नाहीत , अशा अनाथ मुलांना
आई वडिलांची त्यांच्या काळजीची, त्यांच्या प्रेमाची , त्यांच्या आपुलकीची आणि त्यांच्या असण्याची / नसण्याची किंमत विचारा. आई वडील नसताना आयुष्यात करावा लागणार संघर्ष विचारा....
आणि एक संकल्प करा कि ,
यापुढे उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित आपली बाजू समजावून सांगू ..
आणि त्यांना समजून घेऊ ...
धन्यवाद
हेमलता यादव कदम
७८७५५५०७८९