फॉलोअर

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

" आई वडिलांची खरी किंमत अनाथ आश्रम मधील मुलांना विचारा "

काही दिवसांपूर्वी मी एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती. त्या आश्रम मध्ये साधारण ७०-८० इतकी लहान मुले होती. अगदी वय वर्ष ते १४-१५ वर्षापर्यंत वय असणारी ... आश्रम नामांकित असल्याने तसे मुलांसाठी सोयी सुविधा व्यवस्थित होत्या. त्यांची तिथे अगदी घरातल्यासारखी काळजी घेतली जाते. कोणत्याही भौतिक गोष्टीची उणीव तिथे नाही.. पाहणाऱ्यांना किंवा दान देणाऱ्या पवित्र हातांना हे चित्र सुखद दिसत होते. तिथे माझ्यासमोर एक घटना घडताना मी पाहत होते आणि त्या घटनेने मी थोडे फ्लॅशबॅक मध्ये गेले.   तीच घटना मला share करावीशी वाटली जरूर वाचा कदाचित तुम्हाला हि कळत नकळत काही गोष्टींची जाणीव होईल. 


माझ्या आधी त्या आश्रमात एक आई-बाबा आपल्या लहान मुलीचा वाढदिवस तिथे साजरा करायला आले होते. सर्व लहान मुलांसोबत तिचा वाढदिवस छान साजरा झाला सर्वानी तिला भरपूर शुभेच्छा हि दिल्या. आश्रमाबाहेर पडल्यानंतर त्या लहान मुलीने रस्त्यावर एक खेळणी विकणारा माणूस पाहिला आणि तिने हट्टच केला कि तिला ती खेळणी हवी आहेत. तिच्या वडिलांनी लगेच आपल्या राजकन्येचा हट्ट पुरविला. आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई - बाबा दोघेही सुखावले. हा प्रसंग माझ्यासोबत आश्रमा मधील एक छोटा मुलगा हि आश्रम च्या गेट मध्ये उभा राहून पाहत होता. त्यावेळी त्याच्या चिमुकल्या डोळ्यात मला काहीतरी असे दिसले कि क्षणात मला माझे बालपण आठवले. 

                                                                     चारा मुखी पिलांच्या 

 चिमणी हळूच देई 
गोठ्यात वासरांना 
ह्या चाटतात गाई 
वात्सल्य हे बघुनी 
 व्याकुळ जीव होइ ... 

मला माझे "दादा-मम्मी " आठवले (मी माझ्या वडिलांना दादा म्हणते)  माझं बालपण माझ्या आई वडिलांमुळे खूप छान गेले मला कोणत्याही गोष्टीची त्यांनी कमी पडू दिली नाही ते खूप श्रीमंत होते असे नाही पण माझे सर्व हट्ट जे त्यांना पुरविता येणे शक्य होते ते दोघांनी मिळून ते पुरविले. आज वयाच्या ३५ व्या वर्षी सुद्धा बऱ्याच कामांसाठी मी माझ्या दादांवर अवलंबून असते . मला ते सर्व क्षण आठवले जे मी माझ्या आई वडिलांसोबत जगले. मी केलेले हट्ट , घाबरल्यावर धावत पळत त्यांच्याकडे जाणे , कधी कधी रुसून बसणं , मग त्यांनी प्रेमानी काढलेली समजूत आजही आठवते. आपण आई वडिलांसोबत तसेच आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कसेही वागत असतो किंबहुना आपण त्यांना गृहीतच धरत असतो ..  कधी कधी आपण त्यांना नको इतके दुखावतो. त्यांना समजून घेत नाही. कळत नकळत पणे माझ्याकडून हि असे झाले असेलच! 

 

मी विचार करू लागले किजर या मुलांना रात्री भीती वाटली तर ती मुले कोणाच्या कुशीत जात असतील. हट्ट करावासा वाटला तर कोणाकडे करत असतील , त्यांना कोणी फिरायला घेऊन जात असेल का ? त्यांना रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळे खावे असे कधी वाटत असेल का ?  

त्यांना रंग कोणते आवडतील असतील? त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे हे ठरवता येत असेल का ? त्यांना या संधर्भात कोण मार्गदर्शन  करत असेल ? शिक्षण सोडा पण साधे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कपडे निवडायची संधी मिळत असेल का ? या विषयी त्यांना काय वाटत असेल कितीहि भौतिक गोष्टी मिळाल्या तरी आई - बाबांच्या प्रेमाची , आपुलकीची , काळजीची , त्यांना ओढ वाटत नसेल का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात गोधळ घालू लागले. या गोष्टी जरी ऐकायला जरी छोट्या वाटत असतील तरी यामागील भावना खूप मोठ्या आहेत. महत्वाच्या आहेत बालपणीचे क्षण, जीवन खूप मोलाचे असते. हे जीवनच कोणाला अनुभवायची संधीच मिळाली नाही तर ... या विचारानेच आणि मम्मी - दादांच्या  आठवणीने चटकन डोळ्यात पाणी आले. मम्मी - दादा शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. 

 

आई - वडिलांसाठी त्यांची मुले त्यांचा स्वाभिमान असतात त्यांचा जीव असतात. आपल्या मध्यम तसेच उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात मुले - मुली हे आई बाबांचे सर्वस्व असतात. मुलांच्या अवतीभवती   आई - बाबांचे आयुष्य फिरत असते.... पण कितीतरी मुलांना आई-वडील जी काळजी करतात त्याची कटकट वाटते....  त्यांच्या अपेक्षा म्हणजे ओझे वाटते. पण कधी त्यांच्या बाजूने तुम्ही विचार करून पाहिलात का ? कि , ज्यांनी आपल्याला जीवन दिले ते आपल्या वाईटाचा विचार कधीच करू शकत नाहीत मग त्याचे कोणत्याही विषयावरचे मत समजून घेता किंवा त्यांना आपला दृष्टिकोन भविष्याच्या दृष्टीने कसा योग्य आहे हे समजून सांगता " तुम्हाला काही कळत नाही., माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करू नका ., मला माझी स्पेस द्या. " हे म्हणायची काय गरज असते. लहानपणी आपण हट्ट केले कि ते आपल्याला समजून सांगत होते आणि आपल्याला ते पटत हि होते. मग जर उतारवयात ते काही हट्ट करतात तर त्यांना रागवता आंपण स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक त्यांना समजून घेऊ शकत नाही का ? या वर जरूर विचार करा. उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा सुलट पद्धतीने तुमचे विचार मांडा.. 

 

ज्यांना आई वडील नाहीत , अशा अनाथ मुलांना  आई वडिलांची त्यांच्या काळजीची, त्यांच्या प्रेमाची , त्यांच्या आपुलकीची आणि त्यांच्या असण्याची / नसण्याची किंमत विचारा. आई वडील नसताना आयुष्यात करावा लागणार संघर्ष विचारा.... आणि एक संकल्प करा कि , यापुढे उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित आपली बाजू समजावून सांगू .. आणि त्यांना समजून घेऊ ... 

 

धन्यवाद 

हेमलता यादव कदम 

७८७५५५०७८९ 

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नात्यांमध्ये व्यवहार आला कि, नाती का तुटतात? - When Business it comes in relationships, why do relationships break up?

 नात्यांमध्ये व्यवहार आला कि , कितीही घट्ट नाती असली तरी ती कमकुवत होतात आणि शेवटी ती तुटतात .. हे असे का होत असेल याचा विचार करण्या ऐवजी एकमेकांना दोष देऊन लोक मोकळे होतात. नात्यांमध्ये व्यवहार करूच नये असे ठामपणे आपल्या समाजात सांगितले जाते. पण चुका समजून घेण्याचे आणि यातील दोष दूर करण्याचे प्रयत्न मात्र कोणी करताना दिसत नाही. लहानपणी शाळेत "एकीचे बळ " हि गोष्ट सांगितली जायची या छोट्याश्या गोष्टींमधून त्यांना एक बोध द्यायचा होता तो असा होता कि "एक काठी तोडणे सहज शक्य आहे , तेच जर ५ काठ्या एकत्र आल्या तर त्या तोडणे मात्र कठीण आहे. " त्यामुळे त्या गोष्टीतील आजोबा त्यांच्या ५ मुलांना हा बोध एका उदाहरणातून सांगतात. आणि मुलांना ते पटते देखील. हि गोष्ट आणि यातून दिला जाणारा बोध खूप मोठा आहे. कधी याचा विचार नसेल केला तर जरूर करा. 


आपण जेव्हा एखाद्या बाहेरील व्यक्तीबरोबर एखादा व्यवहार सुरु करतो तेव्हा त्या व्यवहाराची सुरवात एखाद्या कराराने होते आणि मग भागीदारीत व्यवसाय सुरु होतो. येथे भावनिक व्यवहार नसतो फक्त आर्थिक व्यवहार असतो. आणि या व्यवहारात नफा - तोट्याची सर्व गणिते स्पष्ट असतात. भागीदारीच्या संमतीने सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळे इथे गैरसमजाला अजिबात जागा नसते. सर्व व्यवहारांमध्ये स्पष्टता असते. आरोप - प्रत्यारोपांना काही अर्थ नसतो. जे काही आहे ते कागद बोलत असतात त्यामुळे या "व्यावहारिक मैत्री" मधील व्यवहार संपला तरी मैत्री मात्र टिकून राहते. नाती तुटत नाहीत. 

याउलट जेव्हा नात्यांमध्ये व्यवहार केला जातो तेव्हा करारापेक्षा मानपान आणि अहंकार याला जास्त महत्व दिले जाते. नात्यांमधील व्यवहार हा व्यावसायिक व्यवहार कमी पण भावनिक व्यवहार जास्त असतो. कागदपत्रापेक्षा इथे विश्वास आणि शब्द यांस जास्त महत्व असते. "भावना आणि व्यवहार" या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेण्यात आजही कमी पडतो. 

जर बारकाईने विचार केलात तर कुटुंबातील किंवा नात्यातील लोकांसोबत व्यवहार किंवा व्यवसाय केला तर घरातील पैसे घरात राहणार आपल्या सोबत आपले लोक देखील प्रगती करतील. आपल्या सहकार्याने ते किंवा त्यांच्या सहकार्याने आपण असाध्य गोष्टी देखील साध्य करू शकतो. फक्त नात्यात जेव्हा आर्थिक व्यवहार येणार असतील तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्या जसे कि , 

मानपान आणि शब्दांपेक्षा पेक्षा करारास महत्व द्या. 

आप-आपल्या कौशल्याप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे कामाची विभागणी करून घ्या.
 
व्यवहारात स्पष्टता ठेवा. विश्वासापेक्षा कागदपत्रांना महत्व द्या. कायम लक्षात ठेवा कि व्यवहार , भावना , नातेसंबंध या सर्व गोष्टी वेग-वेगळ्या आहेत. त्यांना वेगवेगळे च ठेवायला शिका. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवहाराला "उपकार" म्हणून पाहू नका. व्यवहाराला व्यवहार म्हणूनच पहा आणि त्यात "नफा-तोटा" पहा.  नात्याला मध्ये आणून त्यात मानपान अहंकार पाहू नका.  

जर नात्यात कोणाला काही नवीन व्यवसाय करायचा आहे आणि आपण मदत करू शकत असाल तर तुम्ही जरूर ती करण्याचा प्रयत्न करा पण त्यात खरंच व्यावसायिक दृष्टिकोन आहे का हे देखील पहा. नसेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा ( अर्थात त्यांची इच्छा असेल तर ) 

आपल्या कुटुंबातील आणि आपली सर्वांची प्रगती व्हावी हा चांगला हेतू आहे आपला त्यामुळे सर्वांच्या व्यावहारिक विचारांना कल्पनांना सामान महत्व द्या. तटस्थपणे मार्केट आणि नव्या कल्पनांचा सारासार विचार करून त्याप्रमाणे प्राधान्यक्रम मिळून ठरवा. यश-अपयशाची जबाबदारी कोण घेणार हे ठरवा . मगच आर्थिक व्यवहाराला सुरवात करा. 

थोडे काळजी पूर्वक आणि भावनेला बाजूला ठेऊन जर तुम्ही कोणासोबत हि आर्थिक व्यवहार केलेत तर कधीहि तुम्हाला पच्छाताप करायची वेळ येणार नाही तुमचे नातेसंबंध व्यवहारांमुळे खराब होणार नाहीत. उलट तुमचा आदर करणाऱ्यांची संख्या वाढेल तसेच तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात भागीदार असल्याने तुमचा आर्थिक स्थर देखील वाढण्यास मदत होईल. नात्यांमध्ये व्यवहार आला तर त्याचा फायदाच होईल फक्त त्या व्यवहारांकडे व्यवहार म्हणूनच तटस्थ पणे पहा. 

तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा 

धन्यवाद 
हेमा यादव कदम 

 

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । - Shri Manache Shlok

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
मनावर नियंत्रण नसणारी व्यक्ती कधीही यश मिळवू शकत नाही , आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण असणे फार महत्वाचे असते. वरील श्लोक मध्ये समर्थ म्हणतात कि , भक्तिमार्गाचा स्वीकार करा मगच श्रीहरी भेटणार , म्हणजेच तुम्हाला हव्या असणाऱ्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घ्या मग ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल , पुढे ते म्हणतात कि "ज्या गोष्टी समाजमान्य नाहीत त्या सोडून द्या आणि ज्या गोष्टी समाज मान्य आहेत त्या करा ... " या पहिल्याच श्लोक मध्ये त्यांनी आपल्याला आनंदाने कसे जगावे हे अगदी सहज सोप्या शब्दात सांगितले आहे पण आपण या कडे फक्त श्लोक म्हणून पाहतो आणि वाचतो. आपल्यातील किती लोक हे आचरणात आणतात ., "काळाबरोबर चालण्याचा सल्ला यात आपल्याला समर्थानी दिला आहे " आपल्यातील किती लोक काळाबरोबर चालतात., स्वतःच्या विचारांमध्ये बदल घडवून आणतात ., "खरं तर बदल म्हणजे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते ." निसर्गातही काळाप्रमाणे बदल घडून येत असतात ., मग आपण हि याच निसर्गाचा भाग असताना आपल्याला बुद्धी , मन , भाषा सर्व काही गोष्टीचे ज्ञान असताना आपण काळाबरोबर का चालत नाही , तुम्ही आम्ही मिळून च समाज बनलेला आहे मग तरीही आपण आपले समाजमान्य नसलेले विचार घट्ट पकडून ठेवतो., बदल स्वीकारत नाही आणि त्यामुळे नैराश्याचा भाग आपण बनतो .. समर्थानी खूप वर्षांपूर्वी आपल्याला सांगितले आहे कि , " जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ "" पण आपल्यातील किती लोक या प्रमाणे वागतात .. अजूनही आपली मने बदल स्वीकारायला तयार नाहीत .. आणि त्यामुळेच आपण नैराश्याचे जोडीदार बनत चाललो आहोत स्वतःचे विचार मांडायची आपल्याला भीती वाटते , "लोक काय म्हणतील ? " या विचाराने आपण आपल्याला करावेसे वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण करत नाही आणि त्यामुळे आयुष्यातील आनंद हरवत जातो .. आयुष्य खूप क्षणभंगुर असते .. त्याचा आनंद घ्या उद्याच्या विचारात आणि कालच्या दुःखात हरवून " आज " ला विसरू नका ..

All The Best
hema yadav kadam

अपयश हे विचारात असते. - "Failure Word is just a Word. Nothing More Than That. "




बऱ्याचदा आपल्या मनात असे विचार येतात कि, जसे आपले आयुष्य आपल्याला हवे होते ते आयुष्य हे नक्कीच नाही. मला अजून काहीतरी चांगले मिळायला हवे होते. मला अपेक्षा वेगळीच होती पण माझ्या सोबत जे घडते आहे ते मात्र काहीतरी वेगळेच आहे. आपल्या हवे होते तितके यश आपल्याला नाही मिळवता आले. असे विचार तुमच्या हि मनात येत असतील तर हा लेख जरूर वाचा आणि जर पटले तर मला कंमेंट मध्ये नक्की लिहा.  

आपल्या यशातील सर्वात मोठा अडथळा कोण असेल तर ते असते आपले मन .... आता हे माझे मत आहे.  कदाचित तुमचे मत माझ्यापेक्षा वेगळे हि असू शकेल! पण व्यक्त होण्याआधी मला काय म्हणायचे आहे ते तर पूर्ण वाचून तर घ्या. तुम्हाला माहित आहे का ? कि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक चांगली - वाईट गोष्ट हि आपल्या विचारांतून आपल्या समोर येऊन उभी राहत असते म्हणून सर्व संत तसेच धार्मिक ग्रंथांतून आपल्याला मन या विषयावर काम करायला सांगितले जाते. मोठं-मोठे मानसशात्रज्ञ  या विषयावर काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर देखील  हेच सांगतात कि मन हे छान असायला पाहिजे तरच आयुष्य छान होणार . सर्व यशस्वी लोक नेहमी सकारात्मक विचार करा. असेच सांगत असतात. कारण हे यश मिळवण्यासाठी त्यांनी मनावर ताबा मिळवलेला असतो. त्यांच्या मनाला आणि अंतर्मनाला ते नेहमी हेच सांगत असतात कि, मला सर्वांपेक्षा काही तरी वेगळे करायचे आहे मला यशस्वी व्हायचे आहे. आणि त्या प्रमाणे कोणत्याही परिस्थिती ते मनाला खचू देत नाही आणि सतत कार्यमग्न होऊन काम करत राहतात. " त्यांना माहित असते आज तूप खाऊन उद्या लगेच रूप येणार नाही " त्यामुळे ते थोड्या यशाने हुरळून जात नाहीत. आणि अपयशाने खचून हि जात नाही. त्यांचे यशाच्या दिशेने अविरत मार्गक्रमण सुरु असते. आणि एक वेळ अशी येते कि या खडतर मार्गावरून चालून त्यांना त्यांचे ध्येय मिळते, सर्व समाज आदराने त्यांचे कौतुक करू लागतो. 

या सर्व यशामागे फक्त ३ महत्वाच्या गोष्टी असतात.  त्या म्हणजे "सातत्य , निष्ठा आणि जिद्द" या ३ गोष्टी तुमच्याकडे असल्या कि तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती तुमच्या ध्येयापासून दूर ठेऊ शकणार नाही. पण जर या ३ गोष्टीवर तुम्ही ठाम राहत नसाल , लोकांनी तुमच्या अपयशाबद्दल बोलण्याने तुमच्या विचारांवर त्याचा परिणाम होत असेल तुमच्या कार्यावर तुमची निष्ठा नसेल तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला अपयशी होण्यापासून वाचवू शकणार नाही. कारण तुमचे मन स्थिर नसणे म्हणजे तुम्ही अपयशी जीवनाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. लक्षात घ्या कि "Failure Word is just a Word. Nothing More Than That. " बस हे इतकेच आहे. याहून अधिक काहीच नाही. या शब्दाचा बाऊ करू नका, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला आणि तुमच्या कल्पनांना वेड्यात काढायला खूप लोक असणारच आहेत. पण त्यांना किती महत्व द्यायचे हे पूर्ण पणे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. तुमची तुमच्या कामावर पूर्ण निष्ठा असायला पाहिजे जे काम तुम्ही करत आहात ते करत असताना कोणताही इतर विचार न करता पूर्ण श्रद्धेने ते कार्य पूर्ण करायला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. घरात किंवा व्यावहारिक जगात वावरताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. 

कोणाच्या आणि कोणत्या बोलण्याला किती महत्व द्यायचे ? 
कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याचा सर्व बाजूनी व्यवस्थित अभ्यास करायचा . 
कामावर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवायची . 
दिवसाची सुरवात सकारात्मक विचारांनी करायची. 
नकारात्मक विचाराच्या सर्व लोकांपासून दूर राहायचे . 
वाचन वाढवायचे कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हि , सकारात्मक विचारांच्या साठ्यासाठी भरपूर वाचन करतात.  तुम्ही यशस्वी झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे चरित्र कथा वाचा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील कि, सर्वसामान्य  ते  असामान्य  हा प्रवास त्यांनी सकारात्मक विचारांच्या जोरावर कसा पार केला. 

चिखलात राहून सुद्धा कमळासारखे खुलून जगण्यालाच खरे जगणे म्हणतात. तुमचे आयुष्य कसे असायाला हवे हे दुसरे तिसरे कोणी ठरवत नसून तुमचे विचार ठरवतात. आपल्यासारख्या च गर्दीत आपले स्वातंत्रसैनिक जन्माला आले पण जाताना समाजाला खूप काही  देऊन गेले. आज हि आपण त्या सर्व थोर महात्म्यांचे ऋणी आहोत. पण हे ऋण फक्त आभार मानून फिटणार नाहीत.  आपल्याला त्यांनी दिलेली शिकवण अमलात आणावी लागेल आपल्याला शिकावे लागेल कि यशस्वी आयुष्य कसे जगायचे आणि सकारात्मक सुंदर विचारांची बाग आपल्या अंतकरणात कशी फुलवायची... आता आपल्याला फक्त स्वतःसाठी स्वतःशी लढायचे आहे आणि स्वतःशीच जिंकायचे आहे ... विचारात परिवर्तन घडवा आयुष्य आपोआप यशाच्या दिशेने वाटचाल करू लागेल... सर्वाना खूप खूप शुभेच्छा .... माझ्या या विचारांवर तुमचे मत अवश्य कळवा . "©"

धन्यवाद
हेमा यादव कदम