त्याच्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती…
ती कधीच कशाच्याही मागे धावणारी नव्हती. स्वतःचं आयुष्य, स्वतःचं काम, स्वतःचा विचार यांत ती समाधानी होती. पण तिच्यापेक्षा सोळा–सतरा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका व्यक्तीशी तिची ओळख झाली आणि हळूहळू ती त्याच्यावर विश्वास ठेवू लागली.
तो प्रेम करतोय, तो तिला स्वीकारेल, तिच्या आयुष्याचा भाग बनेल असं तिला वाटलं. या विश्वासावर तिने अनेक गोष्टी सोडल्या. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, आणि हळूहळू स्वतःलाच बाजूला ठेवलं.
त्याने सांगितलं म्हणून तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. पण शरीराने आणि मनाने ती नवऱ्याऐवजी त्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहिली.आज नाही तर उद्या तो स्वतःहून स्वीकारेल या आशेवर तिने आई होण्याचा निर्णयही पुढे ढकलला. सगळ्यांचा विरोध पत्करला. एकटी पडली. तरीही थांबली, कारण तिला त्याच्यावर विश्वास होता. वर्षामागून वर्षं गेली. बारा वर्षं इतका काळ वाट पाहूनही त्या व्यक्तीत काहीच बदल झाला नाही. तिच्या आयुष्यात प्रश्न वाढत गेले. ती एकटीच सगळं सहन करत होती. त्याला वेळ द्यायचा असेल तेव्हा तो देत होता, अगदी ठेवलेल्या बाई ला देतात ना तसा , स्वतःच्या सर्व गोष्टी सांभाळून , चुकून वेळ मिळाला तर .... अर्थात यात त्याची चूक काहीच नाही, तो आधीपासून या नात्याबद्दल क्लिअर होता ..... चूक होती ती अपेक्षा करणाऱ्या तिची
..... तीच प्रेम आंधळं होत कदाचित .... ती स्वतःला विसरून त्याच्या मागे वेडी झाली. महत्त्वाची बारा वर्षं त्याच्या पायाशी घालवली. आयुष्याचा सगळ्यात मौल्यवान काळ त्याच्याकडून फक्त हे ऐकण्यासाठी खर्च केला कि — "मी आहे तुझ्यासोबत". पण प्रत्यक्षात तिला मिळालं — वेळ नाही, बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. तू माझी priority नाहीस.
ठेवलेली बाई ते वांझोटी बाई हा प्रवास खूप अवघड होता. हा प्रवास फक्त शरीराचा नव्हता, तर मनाचा होता. प्रश्न, टोमणे, वेदना आणि एकटेपणा — हे सगळं ती एकटीच सहन करत होती. ज्याच्यासाठी तिने सगळं सोडलं, त्याच्याकडून तिला फक्त वाट पाहणंच मिळालं. त्याच्या प्रेमाच्या नादात स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलेली ती स्त्री या प्रवासात एकटीच लढत राहिली. तो खरंच कधी प्रेमात होता की नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कारण सर्वस्व गमावल्यानंतरही तिला मैत्रीण म्हणूनसुद्धा वेळ देणं त्याला जड जात होतं — हेच तिचं खरं दु:ख होतं.
ती त्याच्यासाठी प्रवास करायची. वेळ काढायची. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवायची. पण जेव्हा ती त्याच्याकडे बोलायला, भेटायला वेळ मागायची तेव्हा त्याच उत्तर ठरलेलं असायचं — “वेळ नाही”, “नंतर”, “आता शक्य नाही”. तो तिला स्पष्ट नकार देत नव्हता, पण तिला कधीच प्राधान्य हि देत नव्हता. ती त्याची priority नव्हती, हे हळूहळू तिला कळत गेलं. त्या व्यक्तीला प्रेमाची गरजच नव्हती. तिने आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा काळ त्या व्यक्तीसाठी दिला, ज्याने कधीच तिच्यासाठी तो प्रयत्न केला नाही.
जे आयुष्य तिने कुणासाठी बाजूला ठेवलं होतं, ते आता तिला स्वतःसाठी परत उभं करावं लागणार होतं — कारण शेवटी तिच्याकडे उरलेली एकच व्यक्ती होती… ती स्वतः., एक गोष्ट मात्र नक्की — इतकी वर्षं वाट पाहणारी ही स्त्री कमकुवत नव्हती. ती चुकीच्या ठिकाणी आपली ताकद खर्च करत होती, एवढंच ...........! कारण प्रेमासाठी झुकणं चूक नसतं, पण स्वतःला संपवून टाकणं चूक असतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा