फॉलोअर

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

" आई वडिलांची खरी किंमत अनाथ आश्रम मधील मुलांना विचारा "

काही दिवसांपूर्वी मी एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती. त्या आश्रम मध्ये साधारण ७०-८० इतकी लहान मुले होती. अगदी वय वर्ष ते १४-१५ वर्षापर्यंत वय असणारी ... आश्रम नामांकित असल्याने तसे मुलांसाठी सोयी सुविधा व्यवस्थित होत्या. त्यांची तिथे अगदी घरातल्यासारखी काळजी घेतली जाते. कोणत्याही भौतिक गोष्टीची उणीव तिथे नाही.. पाहणाऱ्यांना किंवा दान देणाऱ्या पवित्र हातांना हे चित्र सुखद दिसत होते. तिथे माझ्यासमोर एक घटना घडताना मी पाहत होते आणि त्या घटनेने मी थोडे फ्लॅशबॅक मध्ये गेले.   तीच घटना मला share करावीशी वाटली जरूर वाचा कदाचित तुम्हाला हि कळत नकळत काही गोष्टींची जाणीव होईल. 


माझ्या आधी त्या आश्रमात एक आई-बाबा आपल्या लहान मुलीचा वाढदिवस तिथे साजरा करायला आले होते. सर्व लहान मुलांसोबत तिचा वाढदिवस छान साजरा झाला सर्वानी तिला भरपूर शुभेच्छा हि दिल्या. आश्रमाबाहेर पडल्यानंतर त्या लहान मुलीने रस्त्यावर एक खेळणी विकणारा माणूस पाहिला आणि तिने हट्टच केला कि तिला ती खेळणी हवी आहेत. तिच्या वडिलांनी लगेच आपल्या राजकन्येचा हट्ट पुरविला. आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई - बाबा दोघेही सुखावले. हा प्रसंग माझ्यासोबत आश्रमा मधील एक छोटा मुलगा हि आश्रम च्या गेट मध्ये उभा राहून पाहत होता. त्यावेळी त्याच्या चिमुकल्या डोळ्यात मला काहीतरी असे दिसले कि क्षणात मला माझे बालपण आठवले. 

                                                                     चारा मुखी पिलांच्या 

 चिमणी हळूच देई 
गोठ्यात वासरांना 
ह्या चाटतात गाई 
वात्सल्य हे बघुनी 
 व्याकुळ जीव होइ ... 

मला माझे "दादा-मम्मी " आठवले (मी माझ्या वडिलांना दादा म्हणते)  माझं बालपण माझ्या आई वडिलांमुळे खूप छान गेले मला कोणत्याही गोष्टीची त्यांनी कमी पडू दिली नाही ते खूप श्रीमंत होते असे नाही पण माझे सर्व हट्ट जे त्यांना पुरविता येणे शक्य होते ते दोघांनी मिळून ते पुरविले. आज वयाच्या ३५ व्या वर्षी सुद्धा बऱ्याच कामांसाठी मी माझ्या दादांवर अवलंबून असते . मला ते सर्व क्षण आठवले जे मी माझ्या आई वडिलांसोबत जगले. मी केलेले हट्ट , घाबरल्यावर धावत पळत त्यांच्याकडे जाणे , कधी कधी रुसून बसणं , मग त्यांनी प्रेमानी काढलेली समजूत आजही आठवते. आपण आई वडिलांसोबत तसेच आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कसेही वागत असतो किंबहुना आपण त्यांना गृहीतच धरत असतो ..  कधी कधी आपण त्यांना नको इतके दुखावतो. त्यांना समजून घेत नाही. कळत नकळत पणे माझ्याकडून हि असे झाले असेलच! 

 

मी विचार करू लागले किजर या मुलांना रात्री भीती वाटली तर ती मुले कोणाच्या कुशीत जात असतील. हट्ट करावासा वाटला तर कोणाकडे करत असतील , त्यांना कोणी फिरायला घेऊन जात असेल का ? त्यांना रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळे खावे असे कधी वाटत असेल का ?  

त्यांना रंग कोणते आवडतील असतील? त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे हे ठरवता येत असेल का ? त्यांना या संधर्भात कोण मार्गदर्शन  करत असेल ? शिक्षण सोडा पण साधे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कपडे निवडायची संधी मिळत असेल का ? या विषयी त्यांना काय वाटत असेल कितीहि भौतिक गोष्टी मिळाल्या तरी आई - बाबांच्या प्रेमाची , आपुलकीची , काळजीची , त्यांना ओढ वाटत नसेल का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात गोधळ घालू लागले. या गोष्टी जरी ऐकायला जरी छोट्या वाटत असतील तरी यामागील भावना खूप मोठ्या आहेत. महत्वाच्या आहेत बालपणीचे क्षण, जीवन खूप मोलाचे असते. हे जीवनच कोणाला अनुभवायची संधीच मिळाली नाही तर ... या विचारानेच आणि मम्मी - दादांच्या  आठवणीने चटकन डोळ्यात पाणी आले. मम्मी - दादा शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. 

 

आई - वडिलांसाठी त्यांची मुले त्यांचा स्वाभिमान असतात त्यांचा जीव असतात. आपल्या मध्यम तसेच उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात मुले - मुली हे आई बाबांचे सर्वस्व असतात. मुलांच्या अवतीभवती   आई - बाबांचे आयुष्य फिरत असते.... पण कितीतरी मुलांना आई-वडील जी काळजी करतात त्याची कटकट वाटते....  त्यांच्या अपेक्षा म्हणजे ओझे वाटते. पण कधी त्यांच्या बाजूने तुम्ही विचार करून पाहिलात का ? कि , ज्यांनी आपल्याला जीवन दिले ते आपल्या वाईटाचा विचार कधीच करू शकत नाहीत मग त्याचे कोणत्याही विषयावरचे मत समजून घेता किंवा त्यांना आपला दृष्टिकोन भविष्याच्या दृष्टीने कसा योग्य आहे हे समजून सांगता " तुम्हाला काही कळत नाही., माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करू नका ., मला माझी स्पेस द्या. " हे म्हणायची काय गरज असते. लहानपणी आपण हट्ट केले कि ते आपल्याला समजून सांगत होते आणि आपल्याला ते पटत हि होते. मग जर उतारवयात ते काही हट्ट करतात तर त्यांना रागवता आंपण स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक त्यांना समजून घेऊ शकत नाही का ? या वर जरूर विचार करा. उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा सुलट पद्धतीने तुमचे विचार मांडा.. 

 

ज्यांना आई वडील नाहीत , अशा अनाथ मुलांना  आई वडिलांची त्यांच्या काळजीची, त्यांच्या प्रेमाची , त्यांच्या आपुलकीची आणि त्यांच्या असण्याची / नसण्याची किंमत विचारा. आई वडील नसताना आयुष्यात करावा लागणार संघर्ष विचारा.... आणि एक संकल्प करा कि , यापुढे उलट उत्तरे देऊन त्यांना दुखावण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित आपली बाजू समजावून सांगू .. आणि त्यांना समजून घेऊ ... 

 

धन्यवाद 

हेमलता यादव कदम 

७८७५५५०७८९